नथुराम गोडसेवरील पुस्तक प्रकाशनाला विरोध
By admin | Published: November 16, 2015 02:00 AM2015-11-16T02:00:20+5:302015-11-16T02:00:20+5:30
नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीनिमित्त गोडसे परिवारातर्फे आयोजित गोडसे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला विवेकवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला.
पुणे : नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीनिमित्त गोडसे परिवारातर्फे आयोजित गोडसे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला विवेकवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. भारतीय न्यायव्यवस्थेने शिक्षा केलेल्या माणसाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. दरम्यान, पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला नव्हता तर पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीनिमित्त गोडसे परिवारातर्फे रविवारी सायंकाळी नानासाहेब गोडसे यांच्या आनंदी विलास येथे अस्थिकलश दर्शन आणि चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच गोडसे यांच्यावरील ‘नथुराम एक हुतात्मा संत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होते. गोडसे याच्या उदात्तीकरणास सामाजिक संघटना व राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांनी पुस्तक प्रकाशनास विरोध दर्शविला. या साठी हे कार्यकर्ते आनंदी विलास बाहेर जमले होते़ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ विवेकवादी कार्यकर्त्यांनी डेक्कन पोलिसांना निवेदन दिले होते़
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी बोलताना अजिंक्य गोडसे म्हणाले, नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नथुराम गोडसे यांच्यावरील कुठल्याही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नव्हता. काही लोकांनी कार्यक्रमाला विरोध केला. पण प्रत्यक्ष कार्यक्रमात कुठलाही अडथळा आला नाही.