ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय मोर्चा
By admin | Published: March 26, 2017 02:27 AM2017-03-26T02:27:57+5:302017-03-26T02:32:13+5:30
महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा विजय हा मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच झाला आहे, असा
पुणे : महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा विजय हा मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच झाला आहे, असा आरोप करीत विविध पक्षांमधील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या विरोधात शनिवारी मोर्चा काढला. यापुढील प्रत्येक निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घेतले जावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. महापालिका निवडणुकीतील भाजपा वगळता विविध पक्षांचे पराभूत उमेदवार मोर्चात सहभागी झाले होते. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, तेहसीन पूनावाला, रूपाली पाटील, प्रशांत कनोजिया, मयूरी शिंदे, कमल व्यवहारे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्तेही उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, भाजपाचा विजय मतदान यंत्रांतील घोटाळ्यामुळेच झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदान झाल्यानंतर, मतदाराला त्याने कोणाला मतदान केले आहे याची माहिती देणारी पावती द्यावी, असा आदेश दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून निवडणुका घेण्यात येत आहेत.
शनिवारवाड्यापासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात मतदान यंत्रासंबधी तक्रारी करण्यात आल्या.(प्रतिनिधी)
मतदानानंतर पावती मिळावी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेतील चर्चेत शुक्रवारी मतदान यंत्रासंबंधींचा विषय उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी शनिवारी पुण्यात विभागीय आयुक्तांना मतदान यंत्राबाबत शंका घेणारे निवेदनही दिले. त्यात त्यांनी मतदान झाल्यानंतर, मतदाराला त्याच्या मतदानाची पावती मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली. भारतीय लोकशाही टिकवायची असेल, तर ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता, बॅलेट पेपरवर घ्यावे.
ईव्हीएम मशीनद्वारे दिलेले मत मतदाराला पाहता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. पुणे महापालिका निवडणुकीत ४१ प्रभागांत पाहणी केली असता, १५ प्रभागांत निवडणूक जाहीर केलेल्या आकडेवारीत १० टक्के मते कमी असल्याचे दिसते, तर उर्वरित प्रभागात झालेल्या मतदानापेक्षा १० टक्के मते जास्त आढळली आहेत . या गैरप्रकाराची दखल घेऊन निवडणूकआयोगाने पुन्हा निवडणूक आणि ती मतपत्रिकेवर असावी, अशी मागणी करण्यात आली.