‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्याला विरोध वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:01+5:302021-08-27T04:16:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यात पीएमआरडीए प्रस्तावित केलेला विकास आराखडा आणि टाकलेले आरक्षण हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यात पीएमआरडीए प्रस्तावित केलेला विकास आराखडा आणि टाकलेले आरक्षण हे गुंतवणूकदारांच्या फायद्याचे आहेत. या चुकीच्या आरक्षणामुळे या भागाचा विकास तर होणार नाही. मात्र, शेतकरी देशोधडीला लागेल. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, ज्या पद्धतीने पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी चुकीच्या पद्धतीने रस्ते झोन हे टाकले आहेत, त्यामुळे काही ठरावीक वर्गांसाठीचा हा आराखडा आहे, अशी शंका येत असल्याची तक्रार आराखडा बाधितांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्याकडे मांडली आहे.
मागील महिन्यात पीएमआरडीएने शिवगंगा खोऱ्यातील अनेक गावांत अल्प भू-धारक शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनीवर अनेक शासकीय जमिनी उपलब्ध असताना पीएमआरडीएने चुकीची आरक्षणे टाकली आहे. या चुकीच्या आरक्षणाने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणाविषयी परिसरातील नागरिकांनी माजी जि. प. सदस्य रमेश कोंडे यांची भेट घेतली. शहरातील तसेच शहराबाहेरील नागरिकांनी शिवगंगा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हे झोन टाकताना त्याचा किंवा त्या जागा मालकांचा जास्त विचार केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. या आरक्षणाविरोधात आम्ही हरकती नोंदविल्या आहेत. मात्र, त्यावर काय निर्णय होईल याची माहिती नाही. रिंगरोड प्रमाणेच आता चुकीचे झोन टाकून शेतकरी वर्गाला गिळंकृत करायचे ठरवले आहे, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी मांडली आहे.
चौकट
पीएमआरडीएने वस्तुस्थितीचा अभ्यास न करताच हे झोन टाकले असल्याचे दिसून येत आहे. आमचे पहिले नाते हे जनतेशी आहे. त्यामुळे जी आरक्षणे चुकीची टाकली गेली आहेत ती रद्द करावीच लागतील. औद्योगिकीकरण वाढत असल्याने त्याप्रमाणे निवासी झोन टाकणे गरजेचे आहे, असे झाले नाही तर भागात ग्रोथ सेंटर नाही तर, झोपडपट्टीचे दृश्य निर्माण होईल. पीएमआरडीएने या भागाकडे ग्रोथ सेंटर म्हणून पाहात असतील तर त्याप्रमाणे झोन टाकले पाहिजेत. शिवगंगा खोऱ्यातील अनेक ग्रामपंचायतीने यावर हरकती घेतल्या आहेत. त्या हरकतींची नोंद केलेल्या पोहोच प्रत्येकाने जवळ बाळगा, म्हणजे त्यावर अंमलबजावणी होतेय का नाही हे लक्षात येईल. यावर पीएमआरडीएचे अधिकारी, तसेच संबंधित प्रशासन यांच्याशी चर्चा करून यशस्वीपणे तोडगा काढला जाईल. समाधानकारक तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी जि. प. सदस्य रमेश कोंडे यांनी दिला.