राष्ट्रवादी नेत्यांच्या खासगी कारखान्यांसाठी विरोध
By admin | Published: June 25, 2017 04:28 AM2017-06-25T04:28:57+5:302017-06-25T04:28:57+5:30
खासगी साखर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर राज्यात अग्रगण्य असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरण आवश्यकच आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : खासगी साखर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर राज्यात अग्रगण्य असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरण आवश्यकच आहे. त्याचबरोबर कारखान्याचे विस्तारीकरणदेखील शासनाकडे सादर केलेल्या परवानग्या मिळाल्यानंतर केल्या जातील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या खासगी कारखान्यांना अडचण होईल, म्हणून त्यांचे संचालक विरोधासाठी विरोध करीत आहेत, अशी टीका कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी केली.
कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारवाढीच्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. माळेगाव कारखान्याच्या ऊस उत्पादकांना जादा दर मिळावा, हीच आमची भूमिका आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हेच खुपते. या कारखान्याने जादा दर दिला तर खासगी कारखान्यांना देखील जादा दर द्यावा लागतो. आता स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेच्या काळात जुन्या यंत्रणेवर काम करणे अडचणीचे आहे. सुरुवातीला १ हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेवरून आता ४ हजार मेट्रीक टनावर गाळप क्षमता नेली. २१ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. बॉयलिंग हाऊसमधील पॅन वापरणे धोकादायक असल्याचा अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने दिला आहे. त्याच अनुषंगाने आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी...
प्रदूषण नियंत्रण मंडळाने अटी घातल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी प्रक्रियाद्वारे नवीन इव्हॉपोरेशन प्रकल्पामुळे स्पेन्टवॉशची विल्हेवाट शक्य होणार आहे. पाणीप्रक्रिया प्रकल्पामुळे २ कोटी लिटर पाण्याची बचत होणार, यासाठी व्हीएसआयने प्रकल्प अहवाल सादर केले आहेत. साखर आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे तिन्ही प्रकल्प मार्गी लावणे क्रमप्राप्तच आहे, असे त्यांनी सांगितले.
आधुनिकीकरणाला ‘असुयेतून’ विरोध...
सहवीजनिर्मिती प्रकल्पदेखील २१ मेगाव्हॅटवरून २८ मेगाव्हॅटपर्यंत नेण्यात येणार आहे. जे चांगले आहे ते करण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रवादीच्या नेत्यांना असुया येते. विशेष म्हणजे २००७ मध्येच ठराव झालेल्या विषयांची कामे आम्ही पूर्ण करत आहोत.
खोटे बोलून रेटून नेण्याचा विरोधकांचा प्रयत्न...
नवीन आले ते स्वीकारण्याची आमची भूमिका आहे. भविष्यातील पिढीसाठी कारखाना राज्यात गुणवत्तेच्या बाबतीत अग्रगण्य राहावा, हीच भूमिका आहे. तरच कारखाना स्पर्धेत टिकणार. परंतु, विरोधी संचालकांनी प्रकल्प होऊ नये, यासाठी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात त्यांचे म्हणणे टिकले नाही. आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत जे विषय घेतले, त्याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यांनी लेखी विरोध नोंदविलेला आहे. तरी देखील खोटे बोलून रेटून नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या संचालकांचा आहे, असेही चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी सांगितले.
विस्तारीकरण होणारच...
आधुनिकीकरणानंतर कारखान्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. साधारणत: साडेसात हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेचा कारखाना होईल. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या राज्य सरकारकडे मागितल्या आहेत. त्या मिळाल्यानंतर विस्तारीकरण होणारच आहे, असेही त्यांनी सांगितले. कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पोंदकुले, संचालक शशिकांत कोकरे, चिंतामणी नवले, जवाहर इंगुले, प्रशांत शिंदे, अविनाश देवकाते, सुरेश खलाटे, प्रमोद गावडे, विनोद तावरे, संजय तावरे, संग्राम काटे आदी यावेळी उपस्थित होते.