पुनर्विकास प्रकल्पाला विरोधच, सर्वसाधारण सभेत विरोधात ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:19 AM2017-11-10T02:19:09+5:302017-11-10T02:19:09+5:30
गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पैसे भरून गाळे घेण्याची मानसिकता दलालांची नाही
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पैसे भरून गाळे घेण्याची मानसिकता दलालांची नाही, आडत्यांचे प्रस्थापित धंदे बंद करून त्यांना विस्थापित करू नका, बाजार समितीने सध्या गाळ्यातील वाढीव जागेची वाजवी रक्कम घेऊन गाळे द्यावेत, जागा उपलब्ध करून देऊन नव्याने मार्केट यार्डाची उभारणी व्हावी, आदी मागण्यांसह विविध सूचनांचा पूर गुरुवारी मार्केट यार्डातील शेतकरी निवास येथे आयोजित आडत्यांच्या बैठकीत निघाला. या वेळी बाजार समितीच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेला ७५० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पास आडत्यांनी एकमताने ठराव करत विरोध दर्शविला. परिणामी, बाजार समिती प्रशासक मंडळाला हा प्रकल्प गुंडाळावा लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागातील मंडईचा प्रस्तावित ७५० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आडते असोसिएशन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी, बाजार समिती प्रशासक मंडळांच्या पदाधिकºयांकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांसह विविध पदाधिकारी तसेच आडते यादरम्यान उपस्थित होते.
मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या इमारतीच्या काही भागास तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे समिती प्रशासनाने येथील सर्व गाळे पाडून नव्याने उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या प्रकल्पास पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी तत्त्वत: मान्यता देत बाजार समितीने यात लक्ष द्यावे, असे देशमुख यांनी सांगितले
होते.
प्रशासनाने आडत्यांना विचारात न घेता संबंधित प्रकल्पाचा आराखडादेखील तयार करून आडते असोसिएशनच्या पदाधिकाºयांना दाखविला होता. प्रकल्पासाठी आडत्यांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने आडते असोसिएशनने त्यावर चर्चा न करता निर्णय घेणे टाळले होते. अखेर गुरुवारी आडत्यांच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला.