सत्ताधाऱ्यांच्या गोवा दौऱ्यावरून विरोधकांत नाराजी
By admin | Published: June 3, 2017 02:41 AM2017-06-03T02:41:23+5:302017-06-03T02:41:23+5:30
एका कंपनीच्या गोव्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त यांनी शुक्रवारी केलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका कंपनीच्या गोव्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त यांनी शुक्रवारी केलेल्या गोवा दौऱ्यावरून विरोधकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पारदर्शकतेची नवी व्याख्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी यावर केली.
महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ व आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी गोवा दौरौ केला. एका कंपनीने त्यांचा गोव्यात सुरू असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह सर्वांना बरोबर घेऊन या विषयावर मार्ग काढावा, असे सत्ताधाऱ्यांना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांची नीती वेगळी दिसते आहे, असे तुपे म्हणाले.
प्रत्यक्ष त्यांच्याच पक्षाचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हेही त्यांच्यासमवेत नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी या दौऱ्याची पुसटशीही कल्पना मला दिलेली नाही. त्यामुळे कोणती कंपनी, कोणी शिफारस केली, त्यांचा प्रकल्प काय आहे, याबाबतही काही माहिती नाही. कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी उरुळी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून सहकार्य आम्ही विरोधी पक्ष असूनही त्यांना देऊ केले होते, मात्र त्यांनी त्याची जाणीव ठेवलेली दिसत नाही, असे तुपे यांनी सांगितले.