रिंगरोड व पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:11+5:302021-06-19T04:08:11+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीत गुरुवारी (दि. १७) प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंगरोड बाधितांची संवाद ...
तीर्थक्षेत्र आळंदीत गुरुवारी (दि. १७) प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंगरोड बाधितांची संवाद बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावित रिंगरोडला विरोध करत पर्यायी मार्ग अवलंब करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना काळविण्याची ग्वाही दिल्यानंतर बाधित शेतकरी शांत झाले.
दरम्यान रिंगरोड प्रकल्पाने अनेकजण भूमिहीन होणार आहेत. शेती, घरे उद्ध्वस्त होणार असल्याने अनेकांना जीवन जगणेही मुश्कील होणार आहे. त्यामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त करून कोणाचे ड्रीम प्रोजेक्ट उभे राहणार नाहीत. विकासाला विरोध नाही; मात्र रिंगरोड व पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे आमच्या जमिनी शिल्लक राहणार नाहीत. अशा या ड्रीम प्रोजेक्टला नेहमी आमचा विरोधच राहणार आहे. प्रस्तावित रिंगरोडची आखणी बदलून ती शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून विकसित करण्याची मागणी संवाद बैठकीत करण्यात आली.
—
फोटो क्रमांक : १७ आळंदी पुणे-नाशिक विरोध
फोटो ओळ : चऱ्होली खुर्द(ता. खेड) येथे प्रशासनाला लेखी निवेदन देताना बाधित शेतकरी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)