रिंगरोडला विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:15+5:302021-06-11T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : प्रस्तावित पुणे रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी कांजळे (ता. भोर) येथे ग्रामस्थांनी रिंगरोडला विरोध कायम ठेवत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : प्रस्तावित पुणे रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी कांजळे (ता. भोर) येथे ग्रामस्थांनी रिंगरोडला विरोध कायम ठेवत रिंगरोड विरोधी कृती समितीच्या वतीने रिंगरोड रद्द करा व रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी गाथा वाचन चक्री उपोषण आंदोलन कांजळे येथे शेतकऱ्यांनी सुरू ठेवले आहे.
कांजळे (ता. भोर) येथे ग्रामस्थ व प्रांताधिकारी, तहसीलदार व एमएसआरडीएचे अधिकारी यांची बैठक कोणताही निर्णय न होता चर्चा निष्फळ ठरली आहे.
कांजळे ग्रामस्थांचा रिंगरोडला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाचे अधिकारी संदीप पाटील यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहीती देण्यासाठी व ग्रामस्थांच्या शंका दूर करण्यासाठी गावामध्येच बैठकीचे अयोजन केले होते. त्याचवेळी ग्रामस्थांनी गाथा पारायण करत चक्री उपोषण चालू केले होते. या बैठकीच्या वेळी संदीप पाटील यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने रिंगरोड प्रकल्पाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांनी काढलेल्या शंकाना ते अपेक्षित उत्तर देऊ शकले नाहीत.
यावेळी ग्रामस्थांनी रिंगरोडमुळे भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ? रिंगरोडमध्ये येणारे गावामधील ओढे, पाणंद रस्ते यांचे काय होणार? तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत शासन दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत दरनिश्चित समितीने दर निश्चित केल्यावर त्याच्या चार किंवा पाचपट मोबदला दिला जाणार आहे. जमिनीमधील विहीर, झाडे यांचा वेगळा मोबदला मिळणार आहे. भूमिहीनाबाबत कोणतीही वेगळी तरतूद या प्रकल्पात केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केल्याने प्रांताधिकारी यांनी ग्रामस्थांची भूमिका लक्षात घेऊन बैठक मधेच थांबविण्यात आली. रिंगरोड विरोधी कृती समितीचे दिनकर दळवी यांनी शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकल्पाबाबत शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. प्रकल्पात येणाऱ्या गावामध्ये अनेक ओढे, पाणंद रस्ते आहेत. यासर्व ठिकाणी पूल किंवा ओव्हरब्रिज कसे होणार ? मोबदल्याबाबत खरे सांगितले जात नाही. शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे दर देऊन चार ते पाचपट दर मिळणार असल्याचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात गावा मधील रेडीरेकनर दराच्या सरासरी नुसार दरनिश्चित केले जाणार आहे. परंतु या गावामध्ये फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपये सरासरी दर निघत आहे. त्यावर चार पट, पाच पट रक्कम झाली, तरी बागायती शेती आम्हाला शेती देणे परवडणार नाही. त्यामुळे आमचा विरोध कायम असून जबरदस्तीने मोजणी केल्यास आम्ही सर्वजण स्वतःला अटक करुन घेणार आहोत, अशी भूमिका ग्रामस्थांसमोर दळवी यांनी मांडली.
फोटो : कांजळे (ता.भोर)येथे ग्रामस्थांनी रिंगरोड विरोधी कृती समितीच्या वतीने रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी व रिंगरोड रद्द करण्यासाठी ग्रामस्थानी भोर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना निवेदन दिले.