ॲमिनिटी स्पेसच्या विक्रीला विरोधच; पाटील यांनी यादी जाहीर करावी : प्रशांत जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:14 AM2021-09-16T04:14:26+5:302021-09-16T04:14:26+5:30
पुणे : महापालिकेच्या मिळकतींची थकबाकी ज्यांच्याकडे आहे मग ते कोणीही असोत. त्यांच्याकडून प्रशासनाने ती निश्चित वसूल करावी, ही आमची ...
पुणे : महापालिकेच्या मिळकतींची थकबाकी ज्यांच्याकडे आहे मग ते कोणीही असोत. त्यांच्याकडून प्रशासनाने ती निश्चित वसूल करावी, ही आमची भूमिका कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी अशा जागा घेतल्या आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीरच करावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना जगताप यांनी सांगितले की, पाटील हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत. पाटील यांनी त्यांच्या मागील साडेचार वर्षातील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात प्रथम खुलासा करावा. आज १८५ पैकी ७४ ॲमिनिटी स्पेस या पाटील यांच्या एकट्या कोथरूड मतदारसंघामध्ये आहेत. याची विक्री करून त्याठिकाणी काय उभारणार आहात? हे त्यांनी जाहीर करावे. केवळ महापालिकेकडे पैसे नाहीत म्हणून ॲमिनिटी स्पेस विक्रीचे समर्थन करून ते पदाधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ॲमिनिटी स्पेसची मर्यादा १५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर करण्यात आली. पण युनिफाइड डीसी रुल्स (विकास नियमावली) हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच अंतिम करण्यात आले आहेत. यात ॲमिनिटी स्पेसची मर्यादा का कमी केली याचे उत्तर पाटील यांनी फडणवीस यांच्याकडूनच घेतले तर अधिक बरे होईल, असेही जगताप म्हणाले.
-----