राजगडच्या रोपवेला शिवप्रेमी संघटनांचा विरोध; मात्र स्थानिकांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:02 PM2021-06-27T20:02:35+5:302021-06-27T20:02:42+5:30
सरपंच, उपसरपंच आणि स्थानिकांच्या बैठकीत निर्णय, राजगडासह तोरणावरही रोपवेची मागणी
मार्गासनी: छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड येथे रोपवे साठी स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. रोपवे संदर्भात काही शिवप्रेमी संघटना विरोध करत होते. त्यामुळे रोपवे हवा की नको यासाठी लव्ही बैठकीचे येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यातील स्थानिक मावळे रोपवेच्या समर्थनार्थ एकवटले असून राजगडासहित तोरणावर देखील तो व्हावा अशी मागणी एकमुखाने करत स्थानिकांनी रोपवेला पाठींबा दर्शविला आहे.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, भोर वेल्हे कृती समिती अध्यक्ष माऊली दारवटकर, इतिहास संशोधक दत्ता नलावडे, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, आदींसह बारा गाव मावळ परिसरातील व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन किल्ले राजगड स्थानिक मावळे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.
इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे म्हणाले, रायगडच्या धर्तीवर राजगडावर विकास प्राधिकरण होण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीने ठराव होणे गरजेचे असून या माध्यमातून गडांचा व परिसराचा विकास होईल. यावेळी राजगडावर रोपवेला पाठिंबा देण्यासाठी वेल्हे पंचायत समितीच्या माध्यमातून ठराव दिला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांनी दिली.