पालखी महामार्गावरील लासुर्णेच्या नियोजित उड्डाणपूल उभारणीला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:04 PM2022-10-19T18:04:24+5:302022-10-19T18:04:41+5:30
बंदिस्त उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना अगदी अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरून वळसा घालून जावे लागणार आहे...
लासुर्णे (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी लासुर्णे येथे तीन उड्डाणपूल नियोजित आहेत. या पुलांमुळे दोन भागात गाव विभागले जाणार आहे. येथील व्यवसाय कोलमडणार असल्याने ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाला विरोध दर्शवला आहे. संपूर्ण गावासह महिला, लहान मुलांसह रस्त्यावर उतरत आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.
लासुर्णे (ता. इंदापूर)येथील ऋतुजा पेट्रोलपंपावर पालखी मार्गाच्या अडीअडचणी संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी हा इशारा दिला. बंदिस्त उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना अगदी अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरून वळसा घालून जावे लागणार आहे. लासुर्णे गाव हे बारा वाड्या आणि तेरा गावे अशा गावांचा व्यवहार बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी पतसंस्था व विविध कार्यकारी संस्था अशा अनेक संस्थांचे जाळे या गावात आहे. या सर्वांवर परिणाम होणार असल्याचे सांगत पुलाला विरोध करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षा विभागाच्या अधिकारी उमादेवी यांनी सांगितले की या महामार्गाचा सर्व्हे २०१८ मध्ये करण्यात आला आहे. यात २०३० पर्यंतची लोकसंख्या तसेच नवीन वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तसेच चिखली, कुरवली कळंब व बोरी आदी गावातील नागरिक लासुर्णे गावातून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ व वाहनांच्या रांगा लागतील. भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढेल हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून तीन उड्डाणपुलांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
यावर सरपंच पाटील यांनी सांगितले की चिखली कुरवली गावातील नागरिक बी.के.बी. एन. मार्गे पंढरपूर तसेच बारामती या ठिकाणी जातील. तसेच कळंब गावातील नागरिक सुद्धा त्याच मार्गाने जातील. त्याचप्रमाणे बोरी गावातील नागरिकांसाठी भवानीनगर तसेच बारामतीस जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे. या चारही गावातील नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी लासुर्णेत येण्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे या रस्त्यावर त्या नागरिकांची गर्दी होण्याचा प्रश्नच येत नाही. या सर्व कारणामुळे आमच्या गावातील उड्डाणपूल हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने केल्याचे सांगितले.
हा पालखी महामार्ग झाला पाहिजे. महामार्गामुळे गावाचा विकास होतो. हे जरी खरे असले तरी या गावातील तीन उड्डाणपुलांमुळे गावचे गावपण हरवले जाणार आहे. गाव दोन भागात विभागले जाणार आहे. अनेकांचे व्यवसाय अडचणीत येणार आहेत. यासाठी प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्यावतीने उड्डाणपूल रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे तसेच नॅशनल हायवे महामार्गाचे सर्व अधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात तो उड्डाणपूल रद्द न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा सरपंच रुद्रसेन पाटील यांनी दिला. तर ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.
... चित्रगुप्त जे लिहितो, ते इंद्रदेव करतो,
ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना चित्रगुप्त जे लिहितो, ते इंद्रदेव करतो, या आशयाप्रमाणे तुम्ही फक्त कागदावर आमच्या मागणीबाबत लिहा, ते आपोआप होऊन जाईल,अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यावर नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.