अजून एक पुस्तक वादाच्या भोवऱ्यात! आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तक प्रकाशनास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:10 PM2022-12-16T20:10:48+5:302022-12-16T20:11:26+5:30
प्रकाशन कार्यक्रम रद्द केला नाही तर वातावरण खराब होण्याची चिन्हे
पुणे : मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावरील 'लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड' या पुस्तकाच्या पुण्यात होत असलेल्या प्रकाशन कार्यक्रमास काही संघटनांनी विरोध केला आहे. प्रकाशन कार्यक्रम होणार असलेल्या स.प. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. प्रकाशन कार्यक्रम रद्द केला नाही तर वातावरण खराब होण्याची चिन्हे आहेत, कार्यक्रम झाल्यास निदर्शने करण्यात येतील असा इशारा निवेदनात देण्यात आले आहे.
कर्नल पुरोहित मालेगावमध्ये झालेल्या सन २००८ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामध्ये ६ जण मरण पावले. १०० पेक्षा जास्तजण जखमी झाले. लष्करी सेवेत असताना अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी असण्यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. गुन्हेगारी कायद्यातील अन्य कलमांतंर्गत गुन्हेही त्यांच्यावर आहेत. हे सर्वच प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा व्यक्तीवरील पुस्तकाचे प्रकाशन स.प. महाविद्यालयासारख्याशिक्षण संस्थेत का व कशासाठी ठेवण्यात आले असा प्रश्न आक्षेप घेणाऱ्या भीमआर्मी बहुजन एकता मिशन व मुलनिवासी मुस्लिम मंच या संघटनांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना केले आहेत. संस्थेच्या व्यवस्थापन समितीसमोर निवेदन ठेवण्याचे आश्वासन प्राचार्यांनी शिष्टमंडळाला दिले.
महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड यांनी स्विकारले. भीम आर्मीचे दत्ता पोळ, मुस्लिम मंचचे अंजूम इनामदार, नीता अडसूळे, सतीश पवार, पंचशिला पवार, जुबेर हुसेन यावेळी उपस्थित होते.
स्मिता मिश्रा यांनी पुस्तकाचे लेखन केले आहे. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त असलेल्या जयंत उमराणीकर, डॉ. सत्यपाल सिंग, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या उपस्थितीत स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये रविवारी (दि.१८) सायंकाळी ४ वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. रेणू कौल वर्मा पुस्तकाच्या प्रकाशक आहेत. निवृत्त मेजर गौरव आर्या कार्यक्रमाचे निवेदक आहेत.