पुणे विद्यापीठातील विचारपीठांना खीळ
By admin | Published: April 14, 2015 01:43 AM2015-04-14T01:43:40+5:302015-04-14T01:43:40+5:30
महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे.
पुणे : महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासह तब्बल १५ अध्यासन प्रमुखांची पदे रिक्त असल्यामुळे विचारपीठाच्या कामकाजाला खीळ बसली आहे.
विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित भीमसेन जोशी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शंतनूराव किर्लोस्कर, सेठ हिराचंद नेमचंद जैन, डी. एस. सावकार, आय.एस.आर.ओ. (इस्रो) स्पेस चेअर, जैवतंत्र व जैव माहितीशास्त्र अध्यासन अशा एकूण १९ अध्यासनांची स्थापना करण्यात आली. परंतु, यातील अनेक अध्यासनांवर गेल्या काही वर्षांपासून प्रमुखांची नियुक्तीच केली गेली नाही. त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची जबाबदारी वयाच्या ७० वर्षांपर्यंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांभाळली. परंतु, दोन महिन्यांपूर्वी कसबे हे सेवानिवृृत झाल्यामुळे आंबेडकर अध्यासनाचे पद रिक्त आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुखपद रिक्त असले तरी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे हे या अध्यासनाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व स्थानिक संस्थांशी करार करून विविध कार्यशाळा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. परंतु, अध्यासनासाठी केवळ २.५ कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्यामुळे विविध कामे करण्यास मर्यादा येतात, असे मत काही अध्यासन प्रमुखांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
अध्यासनांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, अध्यासन प्रमुखांच्या कामकाजाची नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यासनांचे कामकाज अधिक सक्षमपणे चालावे, असा प्रयत्न विद्यापीठातर्फे केला जातो. विद्यापीठ फंडातून अध्यासनांसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जातो. राज्य शासन, केंद्र शासन किंवा कोणत्याही संस्थेकडून अध्यासनांसाठी आर्थिक सहकार्य मिळत नाही.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ृत्रुटी असल्याने अहवाल नाकारला
४अध्यासनांच्या कामात सुसूत्रता कशी आणता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. परंतु, या समितीने दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यापीठाने या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. तसेच अध्यासन प्रमुखपदाचा कार्यकाल संपल्यानंतर रिक्त पदावर विद्यापीठाने नवीन व्यक्तींची नियुक्तीही केली नाही. परिणामी वर्षभरापासून अध्यासनांचे कामकाज ठप्प आहे.