विरोधकांचा राज्यमंत्री भरणेंच्या विरुद्ध अभद्र डाव: दत्तात्रय घोगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:54+5:302021-04-27T04:09:54+5:30
सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री यांना विरोध करणाऱ्या नेते मंडळींना सत्य परिस्थिती अजिबात माहिती नाही. आणि इंदापूरच्या विरोधकांनी विरोध केला तर ...
सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री यांना विरोध करणाऱ्या नेते मंडळींना सत्य परिस्थिती अजिबात माहिती नाही. आणि इंदापूरच्या विरोधकांनी विरोध केला तर शेतकरी विरोधकांना जोड्याने हाणतील, म्हणून इंदापूरच्या विरोधकांनी व त्यांच्या बगलबच्चांनी सोलापूर जिल्ह्यात जावून, त्या ठिकाणी पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात विष पेरण्याचे काम सुरू केले आहे. असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता, जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी पळविले, असा गैरसमज जनतेमध्ये विरोधक पसरवित आहेत. मात्र वास्तविक पाहता, उजनीतून इंदापूरला ५ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी मिळविली. मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदारी म्हणून उजनी धरणात १५ टीएमसी पाणी वाढवून आणले आहे. हे विरोधक जनतेला कदापि सांगणार नाहीत. कारण त्यांना शेतकऱ्यांचे भले नाही तर केवळ राजकारण करायचे आहे.
निरा नदीवर सोमणथळी उद्धट व खोरोची बेटात ३ बॅरेजेस उभारून निरा नदीचे उद्धट ते डाळज बोगद्याद्वारे उजनी जलाशयात १० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी जलाशयात जुलै महिन्यापासूनच पाण्याचा येवा ( विसर्ग ) येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे उजनी जलाशयात पाणी नियोजनात हे अतिरिक्त म्हणून हे पाणी येणार आहे. त्यामुळे कोणाचेही पाणी कपात अथवा पळविणे हा विषय कोठे येतच नाही.
त्याच प्रमाणे मुंबई टाटा डॅम ( धरण ) चे विद्युत निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ५ टीएमसी पाणी उजनी धरणात केव्हाही सोडता येणार आहे. अशा प्रकारे कोणाचेही पाणी पळविले नसताना विरोधकांचे अपयश झाकून ठेवण्यासाठी व या योजना पूर्णत्वास जावू नयेत, शेतकरी वर्ग कायम उपेक्षित राहिला पाहिजे, म्हणजे यांना कायम राजकारण करता येईल यासाठी जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे मोठे षड्यंत्र विरोधकांनी रचले आहे. असाही आरोप घोगरे यांनी केला आहे.
उपसा सिंचन आराखडा बैठकीला उपस्थिती
इंदापूरच्या दुष्काळी गावांना व जवळपास मागील तीस वर्षांपासून शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना लाकडी निंबोडी योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याबाबत आराखडा तयार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, पाटबंधारे मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे सचिव, मुख्य सचिव तसेच टाटा डॅमचे अविनाश सुर्वे, जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे स्वतः उपस्थित होते. त्यावेळी संपूर्ण आराखडा समजून सांगण्यात आला होता.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व दत्तात्रय घोगरे