अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:23 AM2019-06-18T04:23:23+5:302019-06-18T04:23:26+5:30
संमिश्र प्रतिक्रिया; दहावीचे महत्त्व कमी होईल
पुणे : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल घटल्याचे खापर भाषा व सामाजिक शास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षेचे (तोंडी) गुण रद्द केल्याच्या निर्णयावर फोडले गेले. तसेच निकाल घटल्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. मात्र, अकरावीतील प्रवेशासाठी पुढील काळात प्रवेश पूर्व
परीक्षेच्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. परंतु, काही शिक्षणतज्ज्ञांनी प्रवेश प्रक्रियेस विरोध केला आहे.
दहावीच्या निकालात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १२.३० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी व पालकांकडून अकरावी प्रवेशाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे गुण
वगळून त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. परंतु, या विद्यार्थ्यांनी वर्षभर परिश्रम घेऊन तोंडी परीक्षेचे गुण मिळवले आहेत.
शासनाने अचानकपणे या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण वजा करून त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका पुण्यातील सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या पालकांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर
झाला आहे.
प्रवेश पूर्व परीक्षेच्या पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचे महत्त्व कमी होईल. परंतु,या वर्षी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे उचित होणार नाही. सर्व भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी लागते. ही बाब खर्चिक ठरेल.
- अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एक समान लेखले पाहिजे. सीबीएसई, आयसीएसई किंवा एसएससी बोर्डाचे विद्यार्थी यांच्यात कोणताही भेदभाव कारणे उचित ठरणार नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये.
- राजेंद्र सिंग, सचिव,
इंडिपेंडेंन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन