एमआयटीकडून शुल्क परत देण्याचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:21+5:302021-06-01T04:09:21+5:30
पुणे : एमआयटी विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीसाठी आकारलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांशी चर्चा ...
पुणे : एमआयटी विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीसाठी आकारलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्याच्यासमोर तीन पर्याय ठेवले जाणार आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीला जाणे किंवा त्याबदल्यात नामांकित विद्यापीठांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे, या पर्यायांचासुद्धा समावेश असणार आहे, असे एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे यांनी सांगितले.
एमआयटी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून नियमित शैक्षणिक शुल्कासह आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीसाठी वेगळे एकूण दोन लाख रुपये शुल्क आकारले. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परदेशात घेऊन जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले. त्यामुळे एमआयटी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेत प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासूनच विद्यार्थ्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू करण्यात आली आहे.
कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांच्या व्यवसाय व रोजगारावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे पालकांचे छत्र हरवले आहे, अशा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्यासमोर शैक्षणिक सहलीसाठी आकारलेले शुल्क परत देण्याचा पर्याय ठेवला जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क त्यांच्याच शैक्षणिक गुणवत्तेसाठी वापरले जावे, या उद्देशाने विद्यापीठाकडून अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु ज्यांना या दौऱ्याला जायचे नाही, त्यांच्यासाठी इतर पर्याय खुले आहेत, असेही दवे यांनी सांगितले.