पुण्यासह सात जिल्ह्यांमध्ये बुधवारी ऑरेंज अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:36+5:302021-08-17T04:17:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने येत्या ३ दिवसांत मध्य भारतासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने येत्या ३ दिवसांत मध्य भारतासह विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ईशान्य भारत, मध्य भारत व त्याला जोडून असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत मराठवाड्यातील अंबड १२०, बिलोली, मांजलगाव, सोनपेठ ५०, लातूर, पाथरी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी मध्य स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १७ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील बहुतांश ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात १८ ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, घाट परिसरातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.