पोटगी टाळण्यासाठी पतीने दाखल केला खोटा पुरावा, पत्नीला दरमहा ५ हजार रुपये देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:10 AM2017-11-25T01:10:44+5:302017-11-25T01:11:01+5:30
पुणे : पत्नीला पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून न्यायालयात वेतनाची खोटी पावती सादर करणा-या पतीचा उद्योग न्यायालयात उघड झाला.
पुणे : पत्नीला पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून न्यायालयात वेतनाची खोटी पावती सादर करणा-या पतीचा उद्योग न्यायालयात उघड झाला. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दावा दाखल केलेल्या पतीला दरमहा ५ हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश खडकी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. जोशी यांनी दिला.
अर्जदार पत्नी आणि तिच्या पतीचे ठरवून लग्न झाले होते. वडिलांनी लग्नात सात लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतरही सासरच्या लोकांकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू करण्यात आला. तिला घरातील कामे येत नाहीत. कपडे व्यवस्थित धूत नाही. ती क्षय रुग्णासारखी दिसते म्हणून टोमणे मारण्यात येत असत. त्यानंतर तिला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले. पुन्हा तिला ते परत घेऊन गेले नाहीत. तिच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा प्रयत्न करूनही तिला नेण्यास त्यांनी नकार दिला.
या प्रकरणी पीडितेने अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. पतीकडून पोटगी अणि घरभाड्यापोटी रक्कम मिळावी, अशी मागणी त्यांनी दाव्यात केली होती. तिच्या पतीने शाळेतून तीन हजार रुपये पगार मिळत असल्याची वेतन पावती न्यायालयात दाखल केली. त्याचा हा खोटा पुरावा अॅड. मुळे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला.
कोणत्याही शासनमान्यताप्राप्त शाळेत इतके कमी वेतन दिले जात नाही. त्याबाबत असलेली अधिसूचना मुळे यांनी न्यायालयात दाखल केली. सरकारच्या अधिसूचनेनुसार शाळेत इतका कमी पगार नाही. त्यापेक्षा जास्त पगार आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पत्नीला दरमहा ५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.
तांत्रिकाकडून विभूती आणून तिला पाण्यात टाकून प्यायला लावली जात असे. तसेच, गारगोटीचे दगड तिच्या अंथरुणाखाली ठेवण्यात येत. तिला मुलगा व्हावा म्हणूनही तिचा छळ केला जात असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मोबाईलदेखील तपासण्यात येई.
याशिवाय, रात्री उशिरा दारू पिऊन तिला शिवीगाळ आणि मानसिक छळ तो करत असे. अगदी ती गर्भवती असताना गर्भपात व्हावा म्हणून तिला गोळ्या खाण्यास भाग पाडले गेले.