मांडवी नदीवर तीन बंधारे बांधण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:56+5:302021-06-04T04:09:56+5:30

दरम्यान, आदिवासी दुर्गम भागातील कोपरे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले ...

Order to build three dams on Mandvi river | मांडवी नदीवर तीन बंधारे बांधण्याचे आदेश

मांडवी नदीवर तीन बंधारे बांधण्याचे आदेश

googlenewsNext

दरम्यान, आदिवासी दुर्गम भागातील कोपरे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

मुंबई मंत्रालयात झालेल्या या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ आदी उपस्थित होते.

जुन्नर तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रातील कोपरेगाव खासदार डॉ. कोल्हे यांनी दत्तक घेतल्यानंतर वर्षानुवर्षे सुरू असलेली पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हळाची लामटी येथील साठवण तलावाचा प्रस्ताव ऐरणीवर आणून, खासदार डॉ. कोल्हे व आमदार बेनके यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना साकडे घातले. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

राज्याच्या जल आराखड्यानुसार कृष्णा खोऱ्यात पाणी उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी असल्याची बाब जलसंपदा सचिवांनी स्पष्ट केली. मात्र आपल्याला या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्याची सूचना जलसंपदामंत्री पाटील यांनी केली. त्यानुसार मांडवी नदीवर साडेतीन एमसीएफटी क्षमतेचे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता कुशिरे यांना दिले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या वर्षभरापासून कोपरे येथील हळाची लामटी साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न चालवले होते. परंतु गतवर्षी देशात कोविड संकट व पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे या संदर्भातील बैठक अधिक काळ लांबली होती . परंतु खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी चिकाटीने पाठपुरावा सुरू ठेवून आज जलसंपदामंत्री पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने खासदार डॉ. कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

--

चौकट

आदर्श ग्राम योजनेत गाव दत्तक घेण्याचा विषय आला तेव्हाच मी अविकसित राहिलेल्या आदिवासी क्षेत्रातील कोपरे गावाची निवड केली. त्यामुळे या गावाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आपल्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

--

फोटोक्रमांक : ०३

फोटो ओळी : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत उपस्थित खा. डॉ. अमोल कोल्हे, जुन्नरचे आ. अतुल बेनके, जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, हेमंत धुमाळ, सुनील कुशिरे, सुभाष भुजबळ आदी.

Web Title: Order to build three dams on Mandvi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.