लाच घेणाऱ्या बाळासाहेब वानखेडे यांच्या दप्तराची तपासणी करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 09:19 PM2019-01-10T21:19:58+5:302019-01-10T21:22:51+5:30
जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी वकिलामार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या दफ्तराची तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने भूमिअभिलेख विभागाच्या आयुक्तांना गुरूवारी दिले आहेत.
पुणे: जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी वकिलामार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या दफ्तराची तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने भूमिअभिलेख विभागाच्या आयुक्तांना गुरूवारी दिले आहेत.
हवा तसा निकाल लावून देण्यासंदर्भात अॅड. रोहित शेंडे यांनी लाच स्वीकारल्याचा प्रकार नुकताच समोर आला.त्यानंतर सुमारे दहा दिवसांनी उपसंचालक वानखेडे यांच्यावर कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.यावर शासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर उहापोह झाला.त्यामुळे वानखेडे यांनी आत्तापर्यंत किती सुनवण्या घेतल्या. त्यात परकणात निकाल दिले.तसेच कोणत्या पध्दतीने दिले. त्यात काही आक्षेपार्ह निकाल देण्यात आले आहेत का ? याबाबत सविस्तर दफ्तर तपासणीचे आदेश राज्य शासनाने आयुक्तांना देण्यात आले आहेत.त्यामुळे या प्रकरणात काही चूकीचा प्रकार आढळून आल्यास संबधितावर कडक कारवाई केली जाणार आहे.
राज्याचे भूमिअभिलेख आयुक्त एस.चोक्कलिंगम म्हणाले, राज्य शासनाने भूमिअभिलेख कार्यालयातील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या कार्यालयाची दफ्तर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार एक पथक तयार केले जाणार असून येत्या दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष दफ्तर तपासणीस सुरूवात केली जाणार आहे.तसेच सध्या बाळासाहेब वानखेडे रजेवर असून, त्यांनी आणखी रजेसाठी केला आहे.मात्र,त्यांना रजा द्यावी किंवा नाही यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.