महिनाअखेरपर्यंत पावसाळी कामे पूर्ण करण्याचे आदेश
By admin | Published: May 15, 2014 04:59 AM2014-05-15T04:59:19+5:302014-05-15T04:59:19+5:30
पावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापनाची कामे आणि उपाययोजना येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना दिल्या
पुणे : शहरातील मॉन्सूनपूर्व तसेच पावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापनाची कामे आणि उपाययोजना येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना दिल्या. या कामांचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी नुकतीच या अधिकार्यांची बैठक घेतली. या वेळी या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुणे यांनी दिली. शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा महापालिका आयुक्तांनी नुकताच प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर भेट देऊन घेतलेला असून, महापालिका हद्दीतील ओढे, नाले तसेच नदीच्या पात्रात साडपाणी सोडले जात आहे. तसेच, हे सांडपाणी वाहून नेणार्या अनेक वाहिन्याही फुटलेल्या असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित होत असल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने संबधितांना हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, रस्त्यावरील खड्डे, शहरातील धोकादायक वृक्ष, इलेक्ट्रीकल पोलची पाहणी करून ते गरज असल्यास काढणे अथवा दुरुस्त करणे; याशिवाय जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी शहरातील धोकादायक सीमाभिंती, जुन्या इमारती, वाडे यांबाबत नोटिसा बजाविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पूरजन्य स्थिती उद्भवल्यास आपत्कालीन विभागाच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून तयारी ठेवण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्याचे सोनुणे म्हणाले. तसेच, शहरातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत १५ पैकी १२ क्षेत्रीय कार्यालयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.