पावसाळी पूर्व कामे योग्यरित्या आणि तातडीने पूर्ण करा: महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:27 PM2021-06-14T22:27:17+5:302021-06-14T22:41:40+5:30
पावसाळी कामांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली पाहणी
पुणे : पुणे शहरातील धोकादायक ठिकाणची पावसाळी कामांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली. त्यामध्ये जवळपास शहरातील वेगवेगळ्या भागातील नाले रुंदीकरण, खोलीकरण, कल्वर्ट वाढविण्याचे, सीमाभिंत, नाल्याची स्वच्छता, काही ठिकाणी ही कामे बाकी आहेत अशा ठिकाणची कामे त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील विविध भागातील पावसाळी आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर मोहोळ यांनी केली. यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार आणि विविध खात्यांच्या प्रमुखांसह प्रभागनिहाय उपस्थिती नगसेवक धीरज घाटे यांची होती.
महापौर मोहोळ पुढे म्हणाले, 'पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. याची खबरदारी घेऊन प्रशासनाला ताबडतोब उपाययोजना करून कामे मार्गी लावण्याची आदेश यावेळी दिले आहेत. यावेळी रमेश वांजळे चौक वारजे,सोनवणे हॉस्पिटल अरण्येश्वर, मित्र मंडळ चौक, कसबा पेठ, रास्ता पेठ, कात्रज आदी ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी अगोदर झालेल्या कामांचा देखील आढाव घेतला.
शहरातील अनेक ठिकाणच्या कामांना वेग आला असून लोकवस्तीच्या परिसरातून वाहणाऱ्या ओढ्या नाल्याची साफ करण्यात येत आहे. इस्माईल बेकरी नाला परिसरात प्रवाहास अडथळा ठरणाऱ्या अनावश्यक स्टॉर्म वॉटर लाइन्स तोडून काढण्यात आल्या. वारजे येथील रमेश वांजळे चौकात रस्त्यावर पाणी साठून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हायवेवर जागोजागी स्लॅब काढून साफ करण्यात आले आहेत .तसेच नेहरू रस्त्यावर फर्निचर विक्रेते नाल्यात फर्निचर ठेवत असल्याने त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे .तसेच अरण्येश्वर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असलेली जलवाहिनी शिफ्ट करण्यात आली आहे.मित्रमंडळ चौकातील आंबिल ओढा शेजारी साने गुरुजी वसाहत परिसरातील अतिृवृष्टीमुळे पडझड झालेल्या सीमा भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे याशिवाय बंदिस्त माणिक नाला मशीनने व ओपन नाला जेसीबी मशीन ने साफ करण्यात आला आहे.
महापौरांचा दौरा "छा-छु" काम :राष्ट्रवादीचा आरोप
पावसाळा सुरू झाल्यानंतर एवढ्या उशिरा जाग आलेली आहे, असे अकार्यक्षम महापौर आणि त्यांचा भोंगळ कारभार लाभला आहे. त्यांचा पाहणी दौरा म्हणजे "छा-छु"काम आहे. महापौरांना आणि सत्ताधारी भाजपला पर्वती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सवाल आहे की एवढ्या उशिरा मंगळवारी (दि. १४) तुम्ही पावसाळा आल्यावर काय पाहणी करणार आणि त्यानंतर काय काम करणार आणि पुणेकरांना काय त्यातून दिलासा देणार? महापौरांच्या पाहणी दौऱ्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदार संघाच्या वतीने निषेध करत आहोत.
- नितीन कदम,अध्यक्ष पर्वती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.