जुन्नर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या धर्म, जातीच्या नोंदी दुरुस्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:07+5:302021-07-03T04:08:07+5:30
जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सामान्य ...
जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सामान्य नोंदवहीमधील धर्म, जात, जन्मतारीख, नागरिकत्व यांच्या नोंदी चुकण्याची शक्यता असल्याने शाळेमध्ये या नोंदवहीची वाचन कार्यशाळा आयोजित करून त्यातील चुका पालकांच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक त्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ जिल्हा शिक्षणाधिकारी पुणे यांचेकडे पाठवावेत, अशा आशयाचे निवेदन गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव गणेश वाव्हळ, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष नीलम खरात, महासचिव सागर जगताप, फिरोज पटेल, संतोष डोळस, विशाल रोकडे, मंदार कोळंबे, रवींद्र खरात आदीनी गटशिक्षण अधिकरी किसन खोडदे व सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांना दिले होते. त्यावेळी या मागणी संदर्भात तत्काळ सर्व शाळांना पत्र काढून कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते.
बहुतांशी मागासवर्गीय अशिक्षित व अडाणी आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश करताना विद्यार्थ्यांसंबंधी आवश्यक असलेली माहितीत चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. मात्र इ.१ लीमध्ये प्रवेश घेताना चुकलेल्या नोंदींमुळे विद्यार्थी व पालकांना त्याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे अशा नोंदींमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी तालुक्यातील सर्व मागासवर्गीय पालकांनी संबंधित शाळेत जाऊन सामान्य नोंदवहीमधील असणाऱ्या चुका दुरुस्त करून घ्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी किसन खोडदे यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व शाळांना लेखी पत्र काढून या नोंदवहीचे पालकांसमोर वाचन करून त्यातील चुका दुरुस्त करुन विहीत नमुन्यात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहे.