अकलूजच्या २ संस्थावर फौजदारी गुन्ह्याचे आदेश
By admin | Published: March 28, 2017 03:31 AM2017-03-28T03:31:25+5:302017-03-28T03:31:25+5:30
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कातील अनियमिततांप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोन कॉलेजविरुद्ध
मुंबई : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कातील अनियमिततांप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोन कॉलेजविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत.
त्यातील धन्वंतरी कॉलेज आॅफ नर्सिंगकडून ७८ लाख ९२ हजार २९९ रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. तर, सहारा इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग एज्यूकेशन या कॉलेजकडून १ कोटी ९० लाख ३ हजार ६६४ रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती वाटपात शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा ठपका या दोन्ही संस्थांवर चौकशीअंती ठेवण्यात आला आहे. राज्यातील शिष्यवृती घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक नेमले होते. या पथकाच्या निर्देशांनुसार सामाजिक न्याय विभागाच्या लातूर येथील प्रादेशिक उपायुुक्तांनी अकलूजमधील दोन्ही कॉलेजचा लेखा परीक्षण अहवाल सादर केला होता. २००८ ते २०१३-१४ या काळातील हे लेखापरीक्षण होते. या संस्था फौजदारी गुन्हे दाखल पात्र असल्याचा अभिप्राय विशेष चौकशी पथकाने दिला होता.
केवळ अकलूजमधीलच नव्हे तर राज्यातील जवळपास तीसहून अधिक संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करून अनियमिततांची रक्कम वसूल करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने गेल्या महिनाभरात दिले आहेत. त्याचे वृत्त लोकमतने दिले होते. (विशेष प्रतिनिधी)
सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आणि घोटाळ्यातील रक्कम वसुलीचे आदेश दिलेले आहेत. त्या नुसार एकेका संस्थेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश माझ्या कार्यायलायने संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयांना दिलेले आहेत. त्या बाबत कार्यवाहीचा अहवाल मी मागविला आहे.
- पीयूष सिंह, आयुक्त, समाज कल्याण; पुणे.