फुरसुंगीत टँकर वाढवण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:12 AM2018-04-10T01:12:39+5:302018-04-10T01:12:39+5:30
फुरसुंगी येथे कचरा डेपो सुरू ठेवण्याच्या बदल्यात महापालिकेकडून तिथे केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची आढावा बैठक सोमवारी दुपारी महापालिकेत झाली.
पुणे: फुरसुंगी येथे कचरा डेपो सुरू ठेवण्याच्या बदल्यात महापालिकेकडून तिथे केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची आढावा बैठक सोमवारी दुपारी महापालिकेत झाली. फुरसुंगी ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीनुसार तिथे पाण्याचे टँकर वाढवून देण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला.
महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप तसेच फुरसुंगीचे प्रतिनिधी म्हणून शंकर हरपळे, संजय हरपळे, प्रवीण कामठे, रणजित रासकर, विशाल हरपळे आदी उपस्थित होते.
फुरसुंगीचा समावेश आता महापालिकेत झाला आहे, मात्र
त्यामुळे महापालिकेचे फुरसुंगीबाबतचे धोरण बदलणार नाही, तिथे सुरू असलेली विकास कामे महापालिकेच्या माध्यमातून सुरूच राहतील, असे या वेळी स्पष्ट
करण्यात आले.
आढावा बैठक महापालिकेच्या वतीने घेण्यात येत असते. सोमवारी झालेल्या बैठकीत प्रामुख्याने टँकरची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.