२५ लाखांच्या आतील कामांच्या तपासणीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:57+5:302021-09-18T04:12:57+5:30
पुणे : शहरात महापालिकेच्या माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत २५ लाखांच्या आतील सुरू असलेल्या एकूण कामांपैकी १० टक्के कामे, ...
पुणे : शहरात महापालिकेच्या माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत २५ लाखांच्या आतील सुरू असलेल्या एकूण कामांपैकी १० टक्के कामे, महापालिकेच्या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्यक्ष जाऊन तपासावीत़, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत़
शहरात सध्या महापालिकेच्या माध्यमातून व क्षेत्रीय कार्यालयाच्या अ यादीतील (नगरसेवकांनी आपल्या प्रभागात सुचविलेली कामे) सुमारे ३५० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे़ यापैकी स यादीतील १२५ कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली असून, ती कामे सध्या शहरात सुरू आहेत़ या कामांमध्ये अनेकदा अनियमितता होत असल्याने, २५ लाखांच्या आतील कामांची तपासणी महापालिकेच्या तीनही अतिरिक्त आयुक्तांनी स्वत: जाऊन करावी व त्याचा तपशीलवार अहवाल सादर करावा असे आयुक्त कुमार यांनी सांगितले आहे़ आयुक्तांच्या या आदेशामुळे आजपर्यंत नेहमी वादात राहिलेल्या स यादीतील कामांची कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मात्र ढाबे दणाणले आहेत़
आपापल्या कार्यक्षेत्रातील कामांची पाहणी या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडून होणार असून, एकूण कामांपैकी कोणती १० टक्के कामे हे अधिकारी आता पाहण्यास येणार याबाबत क्षेत्रीय कार्यालयाच्या डोक्यावर टांगती तलवार आली आहे़; कारण यापूर्वी महापालिका आयुक्तांनी अशाच प्रकारे विकासकामांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते, त्यावेळी काही गैरप्रकार उघडकीस आले होते़ यामध्ये दोषी आढळलेल्या चार अभियंत्यांची चौकशी करण्यात येत असून, काही अभियंत्यांकडून खुलासा मागविण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे़