फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला व्याजासह पैसे देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 06:25 PM2019-02-14T18:25:32+5:302019-02-14T18:29:28+5:30
वारजे येथील माटे दाम्पत्याने २०१२ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ५ लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती.
पुणे : मुदत ठेवीच्या रक्कमेचा धनादेश न वटल्या प्रकरणी दोषी ठरलेल्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदारांना ५ लाख रुपयांवरील रक्कमेच्या व्याजासह ७ लाख २६ हजार १०० रुपये तीस दिवसांत देण्याचे आदेश अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख यांच्या मंचाने दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास तक्रारदार दहा टक्के दराने पैसे मागण्यास पात्र ठरतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे या दाम्पत्याने उदय पाटणकर या ब्रोकरच्या (मध्यस्त) माध्यमातून २०१२मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ५ लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. या ठेवीची मुदत २०१५ मध्ये संपली. त्या पोटी फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरने माटे दाम्पत्याला ७,२६,१०० रुपये देणे अपेक्षित होते. माटे यांना सप्टेंबर २०१५ मध्ये दोन धनादेश देण्यात आले. मात्र, दोन्ही धनादेश वटले नाहीत. माटे यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये पुन्हा नव्याने दोन धनादेश दिले. मात्र ते भरू नयेत, अशी सूचना कंपनीने केली. तिसऱ्यांदा मे २०१६ मध्ये दोन धनादेश दिले गेले. मात्र तेही वटले नाहीत. त्यामुळे माटे यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
या प्रकरणावर सुनावणी घेत ग्राहक मंचाने फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व ब्रोकर पाटणकर यांना एक महिन्याच्या आत ५ लाख रुपये २०१२ पासून ८ टक्के व्याजदराने द्यावेत. तक्रारदारांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासापोटी ५० हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.