खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाकडून ६ कोटी ८१ लाखांच्या वसुलीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:22 AM2019-09-19T11:22:49+5:302019-09-19T11:26:39+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
राहुल शिंदे -
पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये अनियमितता झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन थांंबविले आहे; तसेच महाविद्यालय प्रशासनास ६ कोटी ८१ लाख ४६ हजार ८११ रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहे; मात्र सेवानिवृत्तीला आलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती तब्बल २१ वर्षा$ंनंतर, अवैध ठरवून ही कारवाई केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खडकी परिसरातील अशिक्षित, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आलेगावकर बंधू यांनी १९३१ मध्ये खडकी शिक्षण संस्थेची स्थापना करून प्रथमत: प्राथमिक शाळा सुरू केली. सध्या या संस्थेचा वटवृक्ष झाला असून, महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम शिकविले जात आहेत; मात्र या संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या सुमारे २५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची नियुक्तीच शिक्षण विभागाने अवैध ठरविली आहे.
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती योग्य असल्याचे गृहीत धरून शिक्षण विभागाने महाविद्यालयाला वेतन व वेतनेतर अनुदान अदा केले. प्राध्यापकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हजारो रुपये वेतन दिले; मात्र संबंधित प्राध्यापकांच्या नियुक्तीमध्ये अनियमितता असल्याचे सांगत जुलै २०१९ पासून संबंधित प्राध्यापकांचे वेतन बंद केले. सेवानिवृत्तीचा काळ जवळ आलेल्या प्राध्यापकांचे वेतन अचानक बंद झाले आहे. त्यामुळे या प्राध्यापकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाºयांकडून सांगितले जात आहे.
.......
उच्च शिक्षण विभागाने सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवेत असलेल्या अशा सुमारे २५ प्राध्यापकांचे वेतन रोखले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थेने न्यायालयात धाव घेतली असून, येत्या २४ सप्टेंबर रोजी याबाबत न्यायालयात बाजू मांडली जाणार आहे; तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत समितंी स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात यामध्ये काहीही तथ्थ नसल्याचे स्पष्ट केले होते. - डॉ. एम. यु. मुलाणी, प्राचार्य, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी
.......
शासनाने त्या-त्या वेळी झालेल्या प्राध्यापकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तपासणे अपेक्षित आहे. सेवानिवृत्त झालेल्या आणि काही महिन्यांनी सेवानिवृत्ता होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेणे चुकीचे आहे. त्यामुळे संस्थेतर्फे याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बंद केल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.- आनंद छाजेड, सचिव, खडकी शिक्षण संस्था