मार्च एंडिंगच्या कामांची बिले थांबविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:48+5:302021-04-12T04:10:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेचे आर्थिक वर्ष संपत असताना मार्च अखेरीस देण्यात आलेल्या वर्क आॅर्डरनुसार २५ मार्चनंतरही काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेचे आर्थिक वर्ष संपत असताना मार्च अखेरीस देण्यात आलेल्या वर्क आॅर्डरनुसार २५ मार्चनंतरही काम सुरू असेल, तर त्या कामांची बिले थांबविण्याचे आदेश झोन क्रं. ५ चे उपायुक्त अविनाश संकपाळ यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मागील आर्थिक वर्षात काढण्यात आलेल्या निविदांच्या वर्क आॅर्डर १९ मार्चपर्यंत तर बिले २५ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कालावधीत होणाऱ्या विकासकामांचा दर्जा आणि सर्व प्रकारची कायदेशीर पूर्तता होते की नाही, याचे आॅडिट करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या पाहणीमध्ये थर्ड पार्टी आॅडिटमधील त्रुटींसह अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या अगोदरच बिले सादर झाल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक ठिकाणी कामांची तपासणी न करताच अभियंते आणि त्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिले मंजूर केल्याचे समोर आले होते. या अहवालावरून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी एक झोनल उपायुक्त, दोन क्षेत्रीय अधिकारी, तीन कार्यकारी अभियंते आणि ११ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ तसेच संबधित अधिकारी आणि अभियंत्यांकडून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे.
महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी आणि कामांचा सुमार दर्जा यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू झाल्याचा आरोप शिवसेना आणि कॉंग्रेसने केला असून संबधित अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
---------------------
काम पूर्ण व्हायच्या आधीच बिले सादर
दरम्यान, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडूनही काही कामे पुर्ण व्हायच्या आधीच बिले सादर केल्याचे समोर आले आहे. बिले सादर करताना ‘सा’ क्रमांक नमूदच केला नसल्याचे लक्षात आल्याने प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत झोन क्र.५ चे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी २५ तारखेला ज्या कामांची बिले सादर झाली आहेत. परंतु अद्याप काम सुरू आहे अशा कामांची बिले थांबविण्याचे आदेश भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत.
---------------------------