कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:15+5:302021-06-01T04:09:15+5:30
पुणे : शहरात कोरोना पॉझिटिव्ह दर ७.५ टक्क्यांवर आला असताना, खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने आपल्या सर्व कर्मचारी, अधिकारी ...
पुणे : शहरात कोरोना पॉझिटिव्ह दर ७.५ टक्क्यांवर आला असताना, खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने आपल्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांना लसीकरण प्राधान्याने करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कर्मचारी व अधिकारी यांचे किती जणांचे लसीकरण झाले आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाने सर्व खाते प्रमुख व विभाग प्रमुख यांच्याकडे मागवली आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश आज (३१ मे) सर्व विभागांना दिले आहेत. यात प्रत्येक विभाग तथा खाते प्रमुख यांनी, आपल्याकडे कार्यरत असलेल्या कायम सेवकांची माहिती प्रपत्र- अ मध्ये व रोजंदारी, मानधनावरील तसेच कंत्राटी सेवकांची माहिती प्रपत्र - ब मध्ये एकत्र करून दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
माहिती देताना कोणत्या सेवकाने लसीचा पहिला डोस घेतला आहे, कोणाचा दुसरा डोस बाकी आहे. कोणी एकही लसीचा डोस घेतला नाही याची माहिती सादर करावी लागणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित झाल्यावर, महापालिका स्तरावर आपल्या सर्व सेवकांच्या लसीकरणाचे पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ही सर्व माहिती आस्थापना विभागाकडे सादर करावी. तसेच ही माहिती पुढील दोन दिवसात सादर न केल्यास संबंधित खाते प्रमुख व विभाग प्रमुख यांना याबाबत जबाबदार धरण्यात येणार आहे.
---------