पुणे: ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:52 AM2022-07-27T08:52:39+5:302022-07-27T08:54:57+5:30
रक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे...
पुणे: जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता अमलांत आली असून निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ११ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला ११ ऑगस्टपर्यंत स्वतःजवळ परवाना प्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या प्रमुखावर राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ पोलीस स्थानक हद्दीतील एकूण २९ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्थानकाला जमा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
शस्त्रपरवाना धारकांनी आदेश प्राप्त होताच ताबडतोब व कोणत्याही परिस्थीतीत सात दिवसाच्या आत शस्त्र जमा करावीत. बारामती तालुका पोलीस स्थानक हद्दीतील ९, वाचलंदनगर पोलीस स्थानक हद्दीतील ३, इंदापूर पोलीस स्थानक हद्दीतील १, शिरुर पोलीस स्थानक हद्दीतील ११, हवेली पोलीस स्थानक हद्दीतील ५ असे २९ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करुन घेण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शस्त्र जमा करताना शस्त्रे ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.