पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश; परिमंडळ उपायुक्तांना नोटीसा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:01 PM2022-08-22T21:01:23+5:302022-08-22T21:01:43+5:30
दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची यादी सादर न केल्याचा ठपाका
पुणे : पथ विभागाने वारंवार लेखी नोटीस बजावून सुध्दा काही क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याच्या कार्यक्षेत्रातील व त्याच्या मार्फत करण्यात आलेल्या दोष दायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यांची यादी सादर केलेली नाही. यामुळे ही यादी त्वरित सादर करावी अन्यथा तुमचे काही म्हणणे नाही असे गृहित धरून तुमच्या पुढील कारवाई करण्यात येईल. अशी नोटीसच आता अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार यांनी पाचही परिमंडळ उपायुक्तांना पाठविली आहे.
शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे दोष दायित्व कालावधीतील १७ रस्त्यांबाबत पथ विभागाने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून, काही रस्ते दुरूस्त करून घेतले आहेत. मात्र क्षेत्रीय कार्यालयांकडून बांधण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण मोठे आहे. या अनुषंगाने डॉ. खेमनार यांच्यासह पथ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच शहराच्या विविध भागांमधील रस्त्यांवरून फिरून रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. या वेळी आढळलेल्या खड्ड्यांचे फोटो जिओ टॅगिंगसह पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. तसेच हे खड्डे त्वरित बुजविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोष दायित्व कालावधीत खड्डे पडलेल्या रस्त्यांसाठी ठेकेदारांवर केलेल्या कारवाईची माहिती मागविण्यात आल्याचे डॉ. खेमनार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान महापालिकेने मुंबईतील एका कंपनीची मदत घेऊन शहरातील रस्त्यांवरील खड्डे विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर कंपनीने मुंबईतील अनेक रस्त्यांची कामे केली आहेत. आयुक्त विक्रमकुमार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासमोर या कंपनीने नुकतेच सादरीकरणही केले. तेव्हा महापालिका प्रशासनाने त्या कंपनीस शंकरशेठ रस्ता, आंबेगाव रस्ता आणि बिबवेवाडी येथील रस्त्याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या कंपनीच्या माध्यमातून विशिष्ट तंत्रज्ञान वापरून काम करायचे झाल्यास काही काळ रस्ता बंद ठेवावा लागेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.