केवळ ८६ विद्यार्थ्यांनाच पीएसआय मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे आदेश, इतर विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:44 PM2022-01-25T22:44:23+5:302022-01-25T22:45:19+5:30
Exam News: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० पोलीस उपनिरीक्षक करीता ८६ उमेदवारांनी अर्ज सादर करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोटिफिकेशन काढले आहे. त्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. या संदर्भात लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर स्टडी सेंटर समोर विद्यार्थी एकत्र जमले होते.
पुणे - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० पोलीस उपनिरीक्षक करीता ८६ उमेदवारांनी अर्ज सादर करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोटिफिकेशन काढले आहे. त्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. या संदर्भात लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर स्टडी सेंटर समोर विद्यार्थी एकत्र जमले होते. पुण्यात एका कामानिमित्त आलेल्या आमदार कपिल पाटील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत संवाद साधला. तसेच या ८६ विद्यार्थ्यां व्यतिरिक्त इतरही जवळपास चार-पाच हजार विद्यार्थ्यांना संधी मिळावी, या मागणीसाठी आयोगाच्या सचिवांशी फोनवरून संपर्क साधला. येत्या गुरुवारी (दि.२७) रोजी मुंबईत आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना आमदार पाटील यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० पोलीस उपनिरीक्षक करीता ८६ उमेदवारांनी अर्ज सादर करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास नोटिफिकेशन जाहीर केले. मात्र, या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांना विरोध दर्शविला आहे. समान गुण असतील तर इतर जवळपास चार ते पाच विद्यार्थ्यांना डावलून केवळ या ८६ विद्यार्थ्यांनाच कसे काय निवडले आहे, असा प्रश्न इतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट याचिका क्रमांक ५७१/२०२२ प्रकरणी उच्च न्यायालयाने सोमवार (दि. २४) रोजीच्या आदेशान्वये याचिकाकर्त्या केवळ ८६ उमेदवारांना २९ व ३० जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी मुंबई महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक १०५६/२०२२ प्रकरणी होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या अनुषंगाने या ८६ उमेदवारांचे अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था आयोगाकडून करण्यात आली आहे.
आमदार कपिल पाटील यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
पुण्यातील दांडेकर पूल येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या आमदार कपिल पाटील यांनी शास्त्री रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर स्टडी सेंटर समोर जमलेल्या २००-२५० विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच लगेच आयोगाच्या सचिवांशी फोनवरून चर्चा करत येत्या गुरुवारी (दि. २७) रोजी मुंबईत आयोगाच्या कार्यालयात चर्चा करण्यात येणार असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. साधरण १५ ते २० मिनिटे विद्यार्थी एकत्र जमले होते. त्यांनी आयोगाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्याचवेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच तात्काळ रस्ता रिकामा केला.