पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता बारा हजार मास्कची 'ऑर्डर'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:38 PM2020-03-24T16:38:11+5:302020-03-24T16:40:14+5:30
शहरात कचरा साठू नये, कचमुळे आणखी आजार अथवा रोगराई पसरु नये, याची काळजी घेण्यात येत आहे.
पुणे : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घरामध्ये बसून आहेत. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परंतु, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचक, पालिकेचे सफाई कर्मचारी आणि कचरा वाहून नेणाऱ्या वाहनंवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी तब्बल बारा हजार कापडी मास्क देण्यात आल्याचे मोळक यांनी सांगितले.
शहरात कचरा साठू नये, कचमुळे आणखी आजार अथवा रोगराई पसरु नये, याची काळजी घेण्यात येत आहे. नुकतेच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मध्यस्थीने उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी पुकारलेले कचरा बंद आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे पालिकेला थोडा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे रुग्ण पुणे शहरात आढळून आल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने पावले टाकत उपाययोजना सुरु केल्या. अधिकाधिक स्वच्छता ठेवण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत काम करणारे हजारो चतुर्थ श्रेणी कर्मचारी रोज सकाळी रस्ता झाडण्यापासून ते कचरा डेपोपर्यंत काम करीत आहेत. यासोबतच स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक घरोघर जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत.
या स्वच्छता दूतांचे आरोग्यही महत्वाचे आहे. सोसायट्यांसह विविध भागामधून कचरा गोळा करताना अनेकांसोबत त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता कर्मचा-यांना देण्यासाठी तब्बल बारा हजार कापडी मास्क तयार करुन घेण्यात येत आहेत. नुकतीच त्यांची ऑर्डर देण्यात आली असून त्यातील दोन हजार मास्क तयार होऊन मंगळवारी प्राप्त झाले आहेत. दररोज, दोन ते तीन हजार मास्क प्राप्त होणार आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छतेकरिता दोन दोन साबण देण्यात येणार आहेत. या साबणांच वितरण सुरु करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख मोळक हे सुद्धा विविध भागात पहाटेपासून फिरत आहेत. मंगळवारी त्यांनी येरवडा, विमाननगर, नगररस्ता, कल्याणीनगर आदी भागात भेट देत कामाची पाहणी करुन कर्मचाऱ्यांसोबत कामही केले.
========
पालिकेकडून कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांकरिता आठवड्याचे नियोजन करण्यात येणार असून हे ‘विकली कॅलेंडर’ लवकरच जाहिर केले जाणार आहे. ओला सूका व अन्य कचरा कोणत्या दिवशी द्यायचा याबद्दलचे हे नियोजन असणार आहे. नागरिकांनीही कमीत कमी कचरा निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे. रस्त्यावर कचरा फेकू नका. सुका कचरा शक्यतो घरामध्येच ठेवा आणि ओला कचरा कचरा वेचकांकडे देण्याचे आवाहन मोळक यांनी केले आहे.
=======
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमिन्स इंडियाच्यावतीने स्वच्छ संस्थेच्या चार हजार स्वच्छता कर्मचा-यांकरिता ‘स्वच्छता मित्र साहित्य संच’ पालिकेकडे देण्यात आले. या किटमध्ये एक हातमोजा (हॅन्ड ग्लोव्हज), दोन साबण, दोन कापडी मास्क चा समावेश आहे.
======