जेजुरीतील बीओटीचे काम सुरू करण्याचे आदेश
By admin | Published: October 1, 2015 01:03 AM2015-10-01T01:03:59+5:302015-10-01T01:03:59+5:30
जेजुरीतील बहुचर्चित बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शाळा खोल्या व गाळ्यांचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बांधकाम सभापतींनी दिल्या आहेत.
पुणे : जेजुरीतील बहुचर्चित बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शाळा खोल्या व गाळ्यांचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बांधकाम सभापतींनी दिल्या आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी याला विरोध केला असून, काम सुरू झाले, तर ते पुन्हा बंद पाडणार, असा इशारा दिला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, शासनाने २००८ रोजी शासन निर्णय पारित करून जिल्हा परिषदेच्या रिकाम्या जागा ‘बांधा वापरा हस्तांतर करा’ या तत्त्वावर विकास करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने ११ प्रकल्प हाती घेणेचे प्रस्तावित केले होते. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन प्राथमिकपणे जेजुरी, बिबवेवाडी व शिरूर येथे शाळा, विश्रामगृहे, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयीन इमारत आदींची अत्यंत आवश्यकता असल्याने सर्वानुमते ठरवले होते. त्यास शासनाने दि. २.५.२००९ रोजी मंजुरी दिली.
त्यानुसार जेजुरी येथील मुख्य चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेतील जुन्या शाळेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर शाळा वर्गखोल्या व गाळ््यांचे बांधकाम करण्यास २0११ मध्ये मंजुरी मिळाली होती. १२ हजार ४३३.४५ चौरस मीटरमध्ये हे बांधकाम करण्यात येत असून, १६१९.१ लाख रुपये इतका खर्च या प्रकल्पाला होणार आहे. यात रेस्ट हाऊस, मराठी शाळा, कंपाउंड वॉल, लॅन्ड डेव्हलपमेंट, पाण्याची टाकी बांधण्यात येत आहे. यातील १५ ते २० टक्के बांधकामही झाले आहे. मात्र, बीओटी तत्त्वावर हे बांधकाम करण्यास विरोधकांनी विरोध केला होता. तसेच सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
त्यानुसार उपअभियंता पुरंदर यांनी कामास भेट देऊन सुरू असलेले काम तांत्रिकदृष्ट्या अयोग्य रीतीने होत असल्याचे पत्र २२ फेबु्रवारी २0१३ रोजी दिले होते. त्यानुसार हे काम बंद ठेवण्यात आले होते.
२२ सप्टेंबर २0१५ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांनी सदर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज जिल्हा परिषदेच्या
स्थायी समितीत हे काम सुरू करण्यासाठी टिप्पणी मांडण्यात आली होती. मात्र, याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला.
शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी हे काम सुरू झाले, तर पुन्हा बंद पाडू, असा इशारा दिला असून, बीओटी तत्त्वावरच हे काम करण्याचा उद्देश काय?
जिल्हा परिषद स्वत: ही जागा का विकसित करीत नाही, असा सवालही केला आहे. (प्रतिनिधी)