घरच्या घरीच पिकवा कमी खर्चात सेंद्रिय भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:37+5:302021-02-23T04:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : सध्या बाजारात येणारा भाजीपाल्यावर अनेक अैाषधे फवारली असतात. ती मानवी शरीरास हानिकारक असतात. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : सध्या बाजारात येणारा भाजीपाल्यावर अनेक अैाषधे फवारली असतात. ती मानवी शरीरास हानिकारक असतात. यामुळे दिवळे येथील एका तरुणाने चक्क घरातच ऑरगॅनिक व्हेजिटेबल टॉवरची निर्मिती करत ६६ प्रकारच्या सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन घरीच घेतले आहे. या भाजीपाल्याची विक्री करून हा तरूण चांगला नफा मिळवत आहे. सुरेश मांढरे असे या उपक्रमशील तरुणाचे नाव आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात व कोरोनामुळे सर्वजण आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. विविध व्यायाम पारंपरिक औषधांबरोबर दररोजच्या जेवणात पौष्टिक व उच्च अन्नद्रव्य मिळविण्यासाठी सर्वच आग्रही आहेत. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. परंतु शंभर टक्के सेंद्रिय भाजीपाला मिळेलच याची खात्री नाही. यासाठी घरच्या घरीच सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेता आले तर आरोग्याची चिंता मिटण्यास मदत होणार आहे. अशी मनीषा बाळगत कापूरव्होळ नारायणपूर रस्त्यावरील दिवळे येथील सुरेश मांढरे या तरुणाने कमी जागेत घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी ऑरगॅनिक व्हेजिटेबल टॉवरची निर्मिती केली. त्याद्वारे अत्यंत कमी खर्चात ताजी भाजी व सेंद्रिय भाजीपाल्याचे त्याने घरीच उत्पादन केले. ऑरगॅनिक व्हेजिटेबल टाॅवर निर्मितीनंतर त्याच्या पेटंटसाठी सूरज मांढरे यांनी अर्ज केला आहे.
कमी खर्चात अधिक भाजीपाल्याल्याचे उत्पादन या ऑरगॅनिक व्हेजिटेबल टाॅवरच्या साह्याने घेता येते. टाॅवरच्या मध्यभागी एक मोठा पाईप लावला असून यामध्ये आपल्या स्वयंपाकघरातील कोरडा कचरा टाकून खतनिर्मितीही त्यांनी केली आहे. याच खताचा वापर भाजीपाल्यासाठी होतो. त्यामुळे घरातील कचऱ्याची समस्या दूर होते. या टॉवरला दिलेले पाणीदेखील टॉवरखालील एका ट्रेमध्ये जमा होते व ते पुन्हा वापरता येते. कमी जागेत आणि कमी कष्टात अशा प्रकारे हे भाजीपाल्याचे उत्पादन या टाॅवरच्या माध्यमातून सूरज घेत आहे.
चौकट
या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी फक्त चार दिवसांतून एकदा फक्त दहा मिनिटे वेळ द्यावा लागतो. ऑरगॅनिक व्हेजिटेबल टाॅवर हा फायबर ग्लासच्या सहामधील टॉवर असून हा टॉवरच्या प्रत्येक पायरी (स्टेप) मध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, सिमला मिरची, पुदिना, कोथिंबीर, गाजर मुळा आणि इतर अशा ६६ प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन सूरजने घेतले आहे.
असा आहे ऑरगॅनिक टॉवर
ऑरगॅनिक टॉवरसाठी फक्त दोन फूट बाय दोन फूट जागा लागते. घराच्या गॅलरीत, टेरेस, हॉल, व्हरांडा या ठिकाणी हातावर घेऊन भाज्यांचे उत्पादन घेता येते. टॉवरचे उत्पादन करून तसेच त्याची वितरण यंत्रणा तयार करून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन वाढवून याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना आत्मनिर्भर करण्याचा सुरेश मांढरे यांचा मानस आहे. या टॉवरबरोबरच त्यासाठी लागणारी इन्स्टॉलेशन खते बियाणे देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सुरेश मांढरे यांनी दिली.
- ऑगॅनिक टाॅवरमध्ये सूरज मांढरे याने लावलेला भाजीपाला.