सेंद्रिय पद्धतीने २१ गुंठ्यांत निघणार १ टन गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:53+5:302021-03-14T04:10:53+5:30
नारायणगाव येथील शेतकरी रामदास पंढरीनाथ काळे यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे. या गव्हाचे ४० रुपये प्रतिकिलो दराने ४०० ...
नारायणगाव येथील शेतकरी रामदास पंढरीनाथ काळे यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे. या गव्हाचे ४० रुपये प्रतिकिलो दराने ४०० किलो गव्हाचे बुकिंग देखील झाल्याचे काळे यांनी सांगितले आहे. काळे यांनी अगदी गव्हाच्या पेरणीपासून गहू काढणीला येईपर्यंत एकही रासायनिक खत किंवा रासायनिक औषधांचा वापर न करता केवळ सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले आहे. काळे यांनी २१ गुंठे क्षेत्रात ९ किलो गव्हाची पेरणी केली होती.रामदास काळे यांची आई,पत्नी यांच्यासह त्यांनी घरच्या घरीच या गव्हाच्या शेतीची मशागत केली आहे.
रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीत गव्हाचे उत्पादन कमी मिळणार आहे. मात्र कोणत्याही रासायनिक खत व औषधाशिवाय घेतलेले शुद्ध अन्न म्हणून सेंद्रिय शेतीकडे पाहिले जाते. रासायनिक खते व औषधांचा वापराचा अतिरेक होऊ लागल्याने अनेक शेतकरी आता घरी खाण्यापुरते का होईना पण सेंद्रिय शेती करत असल्याचे चित्र आता दिसत आहे. काळे यांनी पेरणीअगोदर १ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात घातले आहे व त्यानंतर बियाण्याची पेरणी केली आहे. ढगाळ हवामानात वात्सल्यचे दशपर्णी अर्क फवारल्यामुळे मावा व इतर किडींचे चांगले नियंत्रण झाले. गहू १०० टक्के ओंबीमध्ये आल्यानंतर गायीचे कोवळे दुधाची (चीक) फवारणी केली. त्यामुळे गव्हामध्ये अधिकची पौष्टिकता तयार झाली आहे.
"अधिक उत्पादनाची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांनी आरोग्याच्या हिताची शेती करावी. सेंद्रिय शेतीतून उत्पादन जरी कमी मिळत असले तरी किमान घरी खाण्यापुरती तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी. कमीतकमी क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने उत्कृष्ट उत्पादन घेता येते."
- योगेश जालिंदर डोंगरे, खोडद
रामदास पंढरीनाथ काळे यांनी आपल्या २१ गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे.