अवयवदानामुळे चौघांना जीवदान
By admin | Published: March 30, 2017 02:31 AM2017-03-30T02:31:34+5:302017-03-30T02:31:34+5:30
पिंपरी-चिंचवड येथील ४७ वर्षीय महिलेचा २५ मार्चला अपघात झाला होता. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील ४७ वर्षीय महिलेचा २५ मार्चला अपघात झाला होता. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मंगळवारी (दि.२८) रात्री महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचा वापर करुन महिलेचे हृदय दीड तासात मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलला नेण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याने ४० वर्षीय महिलेला जीवदान मिळाले. एक किडनी आणि एक यकृत पुण्यातील रुबी हॉस्पिटलला, तर १ किडनी पिंपरी-चिंचवडमधील बिर्ला हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आली, अशी माहिती पुणे झेडटीसीसीच्या प्रमुख आरती गोखले यांनी दिली.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयव दान करण्याची परवानगी दिली. त्यानंतर राज्याच्या झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डीनेशन सेंटरने (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीनुसार ब्रेन डेड रुग्णाचे हृदय मुलुंडला, १ किडनी आणि १ यकृत पुण्याला रवाना केले, तर १ किडनी बिर्ला हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आली. याबाबत सांगताना बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. संजीव कुमार जाधव म्हणाले, की बुधवारी दुपारी दीड वाजता शस्त्रक्रिया सुरु झाली. शस्त्रक्रिया ५ वाजून ५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. ग्रीन कॉरिडॉरचा वापर करुन बिर्ला हॉस्पिटल ते पुणे विमानतळ हे २६ किलोमीटरचे अंतर २२ मिनिटांत पार करण्यात आले. पुण्यातून चार्टर्ड विमानाने ६.३० वाजता हृदय मुंबईला पोचवण्यात आले. तेथील ४० वर्षीय महिलेमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि तिला जीवनदान मिळाले. डॉ. जाधव आणि डॉ. अन्वय मुळे यांच्या टीमने हे प्रत्यारोपण पार पाडले. रुबी हॉस्पिटलमधील ५६ वर्षीय महिलेला यकृत, तर ६२ वर्षीय महिलेला किडनी प्रत्यारोपण केले, अशी माहिती डॉ. शीतल महाजन व डॉ. अभय सदरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे हृदय मुंबईमधील एका रुग्णालयात विमानाद्वारे पोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चिंचवड ते विमानतळ असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ राबवला. चिंचवड ते विमानतळ हे २६ किलोमीटरचे अंतर अवघ्या २३ मिनिटांत पार करुन हृदय सुरक्षितपणे विमानापर्यंत पोचवल्याची माहिती उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. या ग्रीन कॉरिडॉरसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात आले होते. संध्याकाळी पाच वाजून २७ मिनिटांनी रुग्णालयामधून रुग्णवाहिका हृदय घेऊन निघाली. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेपुढे एक पायलट व्हॅन ठेवली होती. या व्हॅनचे नेतृत्व सहायक निरीक्षक आर. एन. पिंगळे करीत होते. रुग्णालयातून निघाल्यानंतर डावीकडे वळून रिव्हर व्ह्यू चौकातून चापेकर उड्डाणपुलावरून ही रुग्णवाहिका अहिंसा चौक, लोकमान्य हॉस्पिटलकडून पुलावरुन महावीर चौकामध्ये नेण्यात आली.
डी मार्टवरून उजवीकडे वळून ग्रेड सेपरेटरमधून नाशिक फाटा, फुगेवाडी, सीएमई चौक, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानकासमोरील चर्च चौकातून पोल्ट्री फार्म चौकातून डावीकडे वळून मुळा रस्ता सर्कलवरुन नेण्यात आली. होळकर पुलाखालून उजवीकडे वळून चंद्रमा चौकातून आळंदी रस्ता, डॉ. आंबेडकर सोसायटी जंक्शन, येरवडा पोस्ट आॅफिसवरुन जेल रस्ता चौकातून गॅरिसन इंजिनिअरिंग चौकातून उजवीकडे वळून लोहगाव विमानतळावर रुग्णवाहिका पोहोचली. रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट मोकळी करुन देण्यासाठी वाहतूक थांबवण्यात येत होती.
पश्चिम भारतातील हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया २०१५ मध्ये करण्याची संधी मला मिळाली. गेल्या दोन वर्षांमध्ये अवयवदानाबाबत मोठी क्रांती घडून आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याने अवयवदानाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. - डॉ. संजीवकुमार जाधव