दिल्लीत ९५ वे साहित्य संंमेलन आयोजित करण्यात संस्थेला रस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:19+5:302021-08-12T04:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नवी दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नवी दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला रस नाही आणि भविष्यात कधीच त्यासाठी पुढाकार घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरहद संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक येथे नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचा पत्ता नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची ९५ व्या साहित्य संंमेलनाच्या आयोजनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. नुकत्याच महामंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनावर चर्चादेखील करण्यात आली आहे. भविष्यात सरहद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहद संस्थेला विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.
सरहद संस्थेचा दिल्लीसाठीचा प्रस्ताव केवळ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर १ मे २०२१ रोजी साठीचा होता. तो प्रस्ताव कोविड अथवा वेगवेगळ्या कारणांनी नाशिक संमेलन पुढे गेल्याने भविष्यात संस्था पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र त्याच वेळी संस्था भविष्यात कधीही साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेणार नसल्याचे लेखी कळवले होते. नाशिकला संमेलनासाठी शुभेच्छा देताना भविष्यात योग्य वेळी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तिगत अहंकार असणाऱ्या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे असे वाटते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------