दुसऱ्या युवा संसदेचे आयोजन
By admin | Published: January 11, 2017 03:27 AM2017-01-11T03:27:42+5:302017-01-11T03:27:42+5:30
युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण व्हावे. तसेच सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा
पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण व्हावे. तसेच सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा, या उद्देशाने पुण्यामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे येत्या २८ व २९ जानेवारीला दुस-या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे पदाधिकारी व संसदेचे संस्थापक अध्यक्ष शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ.सुधाकर जाधवर, रामदास माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे, बाप्पू कारंडे आदी उपस्थित होते.
शार्दूल जाधवर म्हणाले, न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात ही संसद होणार आहे. देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून गोवा, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड येथून सुमारे १५० विद्यार्थी संसदेत सहभागी होतील. तर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा यांसह विविध भागांतून सुमारे २ हजार विद्यार्थी पुण्यात येण्याची अपेक्षा आहे.
सुधाकर जाधवर म्हणाले, सामाजिक चळवळ आणि युवक, अभिव्यक्ती - देशभक्ती आणि देशद्रोह, राजकारण आणि नैतिकता अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश आहे.
(प्रतिनिधी)