अनाथ, वंचितांच्या दारी आनंदमय दिवाळी, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:22 AM2017-10-20T03:22:08+5:302017-10-20T03:22:21+5:30
वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल...
पुणे : वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे. एखाद्या तरी मुलाला, तू मला आवडतोस असे म्हणून आपुलकीच्या भावनेने जवळ घ्यावे तरच ईश्वराने निर्माण केलेल्या या बालकांना आपलेपणा देण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडेल, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी सांगितले.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरिता श्रीवत्स संस्थेत आपुलकीची दिवाळी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, उद्योजक रसिक नहार, सोफोशचे अरविंद हेर्लेकर, अनिल नवले, निवेदिता गोगटे, निर्मला लाहोटी, आदिती देवधर, शाम मेहेंदळे, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीवत्स, एकलव्य न्यास आणि प्राथमिक शिक्षण मंडळ, रास्ता पेठ यांना आवश्यक असणारी औषधे, धान्य, जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्य आणि रोख रक्कम अशी एकूण ५ लाख रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. उपक्रमाचे यंदा २०वे वर्ष आहे.
मुक्ता टिळक म्हणाल्या, ज्यांचे या जगात कोणीही नाही अशांना अनाथ आश्रमात ठेवणे हे ठीक असले, तरीही अपत्य म्हणून मुली झाल्या म्हणून त्यांना आश्रमात सोडून जाणे, ही परिस्थिती आजच्या २१व्या शतकात काळजी करण्यासारखी आहे. केवळ स्त्रीभ्रूणहत्येवर बोलणे पुरेसे नाही, तर त्यावर काम करुन समाजातील अशा विचारांच्या लोकांचे मतपरिवर्तन करणे आवश्यक आहे.
दिवाळीनिमित्त या तिन्ही सामाजिक संस्थांना एलआयसी पुणे शहर, आफळे अॅकॅडमी, हिंदू महिला सभा, चिमण्या गणपती मंडळ, नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मंडळ, शनिपार गणेशोत्सव मंडळ, प्रभात मित्र मंडळ, इमर्सन कंपनी, युनिक आॅफसेट, कुंभोजकर मित्र मंडळ, हिंदू राष्ट्र तरुण मंडळ यांसह अनेक संस्थांनी मदत दिली. श्रीवत्समधील चिमुकल्यांनी नृत्य सादरीकरण केले. आर्या ठाकूर हिने सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. अवधूत काजरेकर यांनी आभार मानले.