कृषी विज्ञान केंद्रावर कृषी सप्ताहाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:24+5:302021-01-17T04:11:24+5:30
या सप्ताहाच्या उद्घाटनास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, ना. जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, ...
या सप्ताहाच्या उद्घाटनास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, ना. जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजित कदम, शंकरराव गडाख , भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, उपसंचालक सुरेश चौधरी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार, डॉ. सुहास जोशी आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्यासाठी विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक उत्पादन ही संकल्पना राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीची राज्य सरकार व केंद्र सरकार मार्फत स्टेट लेवल टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून निवड झाली आहे . राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषी तंत्रज्ञान सप्ताह पार पडत आहे. दर वर्षीच्या कृषक प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग, ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश असेल. याशिवाय मिलेट वर्ल्ड मधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाशी निवडीत लाईव्ह डेमो पाहता येणार आहेत.
कृषी सप्ताहात मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र उत्पादित हायड्रोजेल तंत्रज्ञान, एकात्मिक शेती प्रणाली ६५ प्रकारची औषध वनस्पतींची संजीवनी बाग, मुरघास उत्पादन तंत्रज्ञान, गाई व म्हैशीतील गर्भ प्रत्यारोपण तंत्रज्ञान, तसेच अॅग्रीकल्चर स्टार्टअप, इस्राईल व नेदरलँड येथील डच तंत्रज्ञानासह विविध प्रयोगांचा समावेश आहे.
शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तापमान मोजून,मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शेतकऱ्यांना प्रवेश देण्याचे नियोजित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.