ऑटो रिक्षा स्टँड डिजाईन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:15+5:302021-04-07T04:11:15+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समाजशास्त्र विभाग व व्हीआयटीच्या वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘ऑटोरिक्षा स्टँड डिजाईन’ ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समाजशास्त्र विभाग व व्हीआयटीच्या वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘ऑटोरिक्षा स्टँड डिजाईन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा)’ सहकार्याने घेतली जात आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या शहरातील रिक्षाथांबा कसा असावा ? याबाबत कधी विचार केला नसेल. मात्र, या स्पर्धेच्या निमित्ताने हा विचार करता येणार आहे. समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांच्या कृती कार्यक्रमच्या माध्यमातून ‘चला आपले शहर स्मार्ट, समावेशक, शाश्वत आणि सुरक्षित बनवू’ या संशोधन प्रकल्पांतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे.
स्पर्धेबाबत डॉ. तांबे म्हणाल्या की, स्पर्धेसाठी येत्या १० एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार असून प्रस्ताव २० एप्रिलपर्यंत सादर करता येतील. स्पर्धेची सविस्तर माहिती विभागाच्या व व्हीआयटीच्या इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण, डिझाइन, रिक्षा संघटना पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ करणार आहेत.
----