पेठ येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:06+5:302021-03-30T04:07:06+5:30
पेठ येथे मागील महिन्यांत दोन फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच काल ...
पेठ येथे मागील महिन्यांत दोन फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच काल पुन्हा या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आले होते. अज्ञात पंधरा ते वीस बैलगाडामालकांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक गणेश डावखर यांनी तक्रार दाखल केली आहे. गायरान जागेतील बैलगाडा घाटात विनापरवाना पंधरा ते वीस बैलगाडा मालक २८ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास बैलांना गाड्या जुंपून पळवत असल्याची माहिती मंचर पोलिसांना मिळाली. मंचर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शर्यत थांबवली. पोलीस नाईक गणेश डावखर, पोलीस जवान एम. डी. भालेकर,पोलीस मित्र स्वप्नील जगदाळे यांनी घाटात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी अज्ञात पंधरा ते वीस लोक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना आढळून आले. बैलगाडा शर्यतबंदी असताना देखील बैलगाडा घाटात शर्यतीचे आयोजन करून बैलांना यातना पीडा होईल अशा प्रकारे वागवून बैलगाडा शर्यती घेतल्याप्रकरणी अज्ञात १५ ते २० बैलगाडामालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणी तीन शर्यतीचे बैल मिळाले असून त्यांचे मालक न कळल्यामुळे मंचर पोलिसांनी बैल भोसरी येथील पांजरपोळ या संस्थेत दाखल केले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी एस. एन. नाडेकर यांनी दिली.