‘वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:57+5:302021-01-20T04:12:57+5:30
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे येत्या २१ ते २४ जानेवारी या कालावधीत सार्वजनिक आरोग्य सेवा, ...
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे येत्या २१ ते २४ जानेवारी या कालावधीत सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षण आणि संशोधनावर आधारित चार दिवसीय ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट आयोजित करण्यात आली आहे.
आरोग्य सेवा परिसंस्थेत अग्रणी व उच्चस्तरीय सुधारणा करणे हा या पार्लमेंटचा प्रमुख विषय आहे. पुण्यातील विश्वराज हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथील माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने हे पार्लमेंट भरविले जात आहे.
वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटचे उद्घाटन येत्या २१ जानेवारीला सकाळी होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. अंबुमणी रामदास, सिक्कीमचे आरोग्यमंत्री डॉ. मणिकुमार शर्मा, जम्मू काश्मीरचे आरोग्यमंत्री असिया नक्काश आणि महाराष्ट्राच्या कोविड १९ टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. येत्या २४ जानेवारीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटचा समारोप होणार आहे. एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले आहे.