एलसीबीचे निरीक्षक यांच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे महावीर जैनच्या कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:33+5:302020-12-07T04:08:33+5:30
पुणे : बीएचआरच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याशी संबंधित मुळ कागदपत्रे हे महावीर जैन ...
पुणे : बीएचआरच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याशी संबंधित मुळ कागदपत्रे हे महावीर जैन याच्या कार्यालयात झडतीच्यावेळी आढळून आले असून जैन याची सीए म्हणून नियुक्ती होण्याआधीच हे कागदपत्रे तेथे कशी आली? याशिवाय करण बाळासाहेब पाटील या कर्जदाराची साडे तीन कोटी रुपयांच्या कर्जाची मुळ फाईल देखील जैन याच्या कार्यालयात आढळून आली. मुळात लेखापरिक्षण अहवालाशी त्याचा काहीही संबंध नाही असेही तपासात निष्पन्न झाले असून याची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती तपासाधिकाऱ्यांनी रविवारी पुणे न्यायालयात दिली.
बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (४०,रा.शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (३७,रा.गुड्डूराजा नगर),ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (४५,रा.देवेंद्र नगर) सुजीत सुभाष बाविस्कर (वय ४२, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहन चालक कमलाकर भिकाजी कोळी (२८,रा.के.सी.पार्कमागे, जळगाव) या पाच जणांच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यामुळे त्यांना रविवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी अडीच असे साडेतीन तास कामकाज चालले. अटकेतील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी केली. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. उमेश रघुवंशी, ॲड. प्रसाद कुलकर्णी यांनी बाजू मांडली. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजुकडील युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.