स्क्रिझोफ्रेनियावरील ‘एनिग्मा-द फॉलेन एंजल’ लघुपटाला ऑस्करचे आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:08+5:302021-09-10T04:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एखाद्या लघुपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कारांमध्ये बाजी मारल्याचे अनेकदा ऐकले असेल! पण, पुण्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एखाद्या लघुपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कारांमध्ये बाजी मारल्याचे अनेकदा ऐकले असेल! पण, पुण्यातील दिग्दर्शक अभय ठाकूर यांच्या ‘एनिग्मा-द फॉलेन एंजल’ या पहिल्याच लघुपटाने पुरस्कारांचा विक्रम रचला आहे. या लघुपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांंमध्ये तब्बल १३५ पुरस्कारांवर मोहोर उमटविली असून, ‘ऑस्कर’ अवॉर्डससाठी या लघुपटाला आमंत्रित केले आहे.
ड्रीम कँचर्स कंपनीच्या मिनी थिएटरमध्ये या लघुपटाचे सादरीकरण केले. यावेळी पूना गेस्ट हाऊसचे सनत सरपोतदार आणि संवादचे सुनील महाजन उपस्थित होते. या लघुपटाची कथा व पटकथा अर्जुन प्रधान यांनी लिहिली असून, हा लघुपट अभय ठाकूर आणि स्नेहल ठाकूर यांच्या ड्रीम कँचर्स कंपनीची पहिलीच कलाकृती आहे. या लघुपटात यतीन कार्येकर, रूचिता जाधव, अनन्या सेनगुप्ता, शंतनु मोघे, रणजित जोग यांनी भूमिका साकारल्या आहेत.
या लघुपटाविषयी दिग्दर्शक अभय ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूडशी स्पर्धा करू शकणारा हा एक रहस्यमय थ्रिलर आहे. लॉकडाऊनकाळात पुण्यातील आमच्याच बंगल्यात या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. हा लघुपट हॉलिवूडच्या दर्जाचा व्हावा याकरिता पार्श्वसंगीत आणि स्पेशल इफेक्टसवर भर दिला आहे. या लघुपटाने जागतिक फिल्म फेस्टिव्हल (ह्युस्टन), दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल, फाल्कन फिल्म फेस्टिव्हल लंडन, बेस्ट शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल लॉस एंजेलिस, कान्स वलर््ड फिल्म फेस्टिव्हल आदी प्रतिष्ठित विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविले आहेत. ऑस्करसाठी या लघुपटाला आमंत्रण येणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या लघुपटाचा पुढील भाग लवकरच हाती घेण्याचा आमचा मानस आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये सर्वाधिक पुरस्कृत चित्रपटांच्या श्रेणीत या लघुपटाची नोंद व्हावी याकरिता अर्ज देखील केला आहे.
पटकथाकार अर्जुन प्रधान म्हणाले की, हा लघुपट स्क्रिझोफ्रेनियासारख्या मानसिक आजाराशी निगडित असल्याने या विषयावर बरेचसे संशोधन आणि अभ्यास केला. आम्हाला अचूकता मांडायची असल्यामुळे विषयाची मांडणी करताना कला स्वातंत्र्य घेतले नाही.
------------------------------------------