ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:22 AM2023-12-12T09:22:21+5:302023-12-12T09:22:46+5:30
मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निकाल, अनुयायांचाही होता विरोध
पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील दोन महत्त्वाचे भूखंड विकण्याचा ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचा डाव (ओआयएफ) फसला आहे. फाउंडेशनचा भूखंड विक्रीसंबंधीचा अर्ज मुंबईचे सहधर्मादाय आयुक्त रुबी उल्हास मालवणकर यांनी फेटाळून लावला आहे.
ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सुमारे ९ हजार ८०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड विकायला काढले होते. ओशो आश्रमाच्या जमीन विक्री व्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर अनुयायी आणि ट्रस्टमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले होते. ट्रस्ट स्वतःच्या फायद्यासाठी जमिनीची विक्री करत असल्याचा आरोप अनुयायांनी केला होता. त्यानंतर काही दिवस अनुयायांनी आंदोलनही केले होते. दरम्यान, कोरेगाव पार्क येथे राहाणाऱ्या बजाज कुटुंबीयांच्या ट्रस्टने हे दोन भूखंड १०७ कोटी रुपये किमतीत खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्टकडून ५० कोटी रुपयांची अनामत आगाऊ रक्कमही फाउंडेशननला दिली होती. ही रक्कमही विनाव्याज परत करण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. तसेच दोन विशेष लेखापरीक्षकांच्या पथकामार्फत २००५ ते २०२३ या कालावधीत फाउंडेशनच्या खात्यांचे विशेष लेखापरीक्षण करण्याचेही आदेश दिले आहेत.
ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे ट्रस्टी, मॅनेजर किंवा अधिकृत व्यक्तीने सर्व रेकाॅर्ड, पावत्या, लेखा परीक्षणाच्या वह्या विशेष लेखापरीक्षकांना उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, विशेष लेखापरीक्षकांनी त्यांच्या नियुक्तीनंतर सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाबाबत ओशो आश्रम वाचविण्यासाठी लढा देणाऱ्या अनुयायांनी आनंद व्यक्त केला आहे.