ओशो फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:15+5:302021-06-25T04:10:15+5:30
पुणे : येथील ओशो फ्रेंड्स फाउंडेशनर्फे पुण्याच्या ओशोप्रेमी शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. ...
पुणे : येथील ओशो फ्रेंड्स फाउंडेशनर्फे पुण्याच्या ओशोप्रेमी शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. ओशो मेडिटेशन रिसॉर्ट (पूर्वीचा ओशो आश्रम) व सद्गुरू ओशोंची समाधी असलेला भारतासाठीचा अनमोल वारसा नियोजनपूर्वक नष्ट केला जात असून ओशोंच्या बनावट मृत्यूपत्राद्वारे तो परदेशात नेला जात आहे, तसेच या आश्रमाच्या काही भागाची विक्री केली जात आहे. या प्रकाराची धर्मादाय आयुक्तांतर्फे तातडीने चौकशी करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
निवेदनात नमूद आहे, की कोविड साथीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची सबब सांगून ओशो आश्रमाच्या काही भागाची १०७ कोटींना विक्री करण्याचा घाट विश्वस्तांनी बांधला आहे. ही विक्री करू नये, यासाठी अनेक ओशोप्रेमींनी रिसॉर्टला झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मदतनिधी देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही रिसॉर्टला झालेल्या कथित नुकसानाचा तपशील आणि कुठलेही समाधानकारक स्पष्टीकरण विश्वस्तांनी दिलेले नाही. त्यांच्याशी संपर्कही साधला जाऊ शकत नाही. आश्रमाचे दैनंदिन प्रवेश शुल्कही सर्वसामान्यांना परवडत नसल्याने ते प्रवेश करू शकत नाही. ओशो समाधीचे दर्शन घेऊ शकत नाही. या विश्वस्तांनी एक खासगी कंपनी स्थापली असून, त्यात तेच संचालक आहेत. या कंपनीत त्यांनी बराच निधी वळवला आहे, असाही आरोपही या निवेदनात केला आहे. विश्वस्तांनी ओशोंच्या बौद्धिक संपदेसंदर्भात केलेल्या गैरव्यवहाराची सीबीआयतर्फे फोरेन्सिक तपासणी करावी, सक्तवसुली विभागातर्फे (ईडी) विश्वस्तांनी देशात आणि देशाबाहेर केलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी आदी मागण्या केल्या आहेत. या शिष्टमंडळात आरती राझदान, स्वामी ऊर्जा, सुनील मिरपुरी, झिया नाथ, किरण दुबे आणि वागिश सारस्वत यांचा समावेश होता.
——————
फोटो-
ओशो फ्रेंड्स फाउंडेशनर्फे पुण्याच्या काही ओशोप्रेमींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात आरती राझदान, स्वामी ऊर्जा, सुनील मिरपुरी, झिया नाथ, किरण दुबे आणि वागिश सारस्वत यांचा समावेश होता.