मंचर उपजिल्हा रुग्णालयात इतर सुविधाही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:14+5:302021-08-23T04:13:14+5:30
मंचर: कोरोनाकाळात मंचर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना डॉक्टर, परिचारिका यांनी चांगली सेवा दिली आहे. दीड वर्षापासून ही सेवा अव्याहतपणे सुरू ...
मंचर: कोरोनाकाळात मंचर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना डॉक्टर, परिचारिका यांनी चांगली सेवा दिली आहे. दीड वर्षापासून ही सेवा अव्याहतपणे सुरू असून या काळात काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले पाहिजे. अवसरी येथे जम्बो कोविड सेंटर सुरू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना इतर सुविधा मिळतील, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात नूतन सुविधा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी कोरोना संकटकाळात जिवावर उदार होऊन रुग्णसेवा करणारे सर्व शासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योद्धा गौरव सोहळा वळसे पाटील व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य उपसंचालक डॉ.संजोग कदम,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी देवदत्त निकम, रामदास वळसे-पाटील,डॉ.लीना गुजराथी,हर्षद शेटे,विनायक खेडकर,अशिष पोखरकर,सागर गुजराथी,सदानंद राऊत,सुरेश ढेकळे,अंबादास देवमाने गणेश पवार,प्रांत सारंग कोडलकर,तहसीलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,कैलास भागवत,निळकंठ काळे आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला.
वळसे पाटील म्हणाले की, मागील दीड वर्षापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. अवसरी खुर्द येथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा रुग्णांना होत आहे.असे सांगून वळसे-पाटील म्हणाले की, पुरेशा आरोग्य सुविधा असताना वैद्यकीय स्टाफ कमी पडतो. तालुक्यात आरोग्य सुविधा उभ्या राहिल्या, मात्र डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध करणे अडचणीचे जाते.त्यामुळे या पुढील काळात डॉक्टर भरती एमपीएससीतून बाहेर काढून आरोग्य विभागामार्फत केल्यास स्टाफ लवकर उपलब्ध होऊ शकतो.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, कोरोनाकाळात उपजिल्हा रुग्णालयावर सर्वाधिक कामाचा ताण होता. येथे तालुक्याबरोबरच बाहेरील गावातील व तालुक्यातील रुग्णांवर उपचार झाले. अवसरी येथे जम्बो कोविड सेंटर सुरु झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना इतर सर्व सुविधा मिळणार आहेत.
संजीवनी कॅटल फिडचे संभाजी थोरात, दादाभाऊ थोरात व अनिल थोरात यांनी उपजिल्हा रुग्णालयाला ५० हजार रुपयांचा धनादेश वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. पूजा थिगळे हिने सूत्रसंचालन केले.
२२ मंचर सत्कार
दिलीप वळसे-पाटील,शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या हस्ते रामदास वळसे-पाटील यांचा गौरव करण्यात आला.